पुणे : पुणेकरांसह देशातील काही शहरामधील घराचे स्वप्न बघणाऱ्या नागरिकांना त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पुण्यातील दरवाढ फारशी परिणाम करणारी नसली तरी भविष्यात घरांचे भाव वाढते राहणार आहेत. 2021-22 मध्ये देशातील 41 शहरांमध्ये घरांच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्याच वेळी, 5 शहरांमध्ये निवासी मालमत्तांच्या किमतीत घट झाली आहे, तर 4 शहरांमध्ये किमती स्थिर आहेत.
वाढीव किमतीत पुण्याचाही समावेश :
नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) च्या आकडेवारीनुसार, अहमदाबादमध्ये पहिल्या आठ शहरांमध्ये सर्वाधिक 13.8% ची दरवाढ झाली आहे. हैदराबादमध्ये 11%, चेन्नईत 7.7 टक्के, दिल्लीत 3.2 टक्के, कोलकात्यात 2.6 टक्के, मुंबईत 1.9% आणि पुण्यात 0.9 टक्क्यांनी किमती वाढल्या आहेत.
नवी मुंबईत घट :
मात्र, नवी मुंबईतील घरांच्या किमती ५.९ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तिमाही आधारावर 50 शहरांच्या निर्देशांकात जानेवारी-मार्च 2022 मध्ये किंमती 2.6 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
निर्देशांकानुसार, जून 2021 पासून तिमाही आधारावर ट्रेंड तेजीत आहेत. कोरोनानंतर निवासी बाजारपेठेत सुधारणा होत आहे.
बांधकामाधीन आणि तयार घरांच्या किमतीही झपाट्याने वाढल्या आहेत. मार्च 2022 च्या तिमाहीत त्यांच्या किमतीत 4.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे, एका वर्षापूर्वी याच तिमाहीत एक टक्क्याने वाढ झाली होती.
अनेक ठिकाणी किमतीत खूप चढ-उतार आहे. भुवनेश्वरमध्ये किमती 23.9% ने वाढल्या, तर इंदूरमध्ये 10.8% ने घसरल्या. जानेवारी-मार्च 2022 या तिमाहीत 50 शहरांचा निर्देशांक 1.9% ने बदलला आहे. त्या आधीच्या तिमाहीत 0.9% चा बदल होता.
किंमती वाढत्या राहतील
भविष्यातही घरांच्या किमती वाढतच जातील. त्याचे कारण म्हणजे लोक स्वतःचे घर शोधत आहेत. शिवाय बांधकामाचा खर्चही वाढत आहे. दुसर्या अहवालानुसार, यावर्षी जानेवारी ते जून दरम्यान घरांच्या विक्रीत 60% वाढ झाली आहे. नवीन घरांच्या बांधकामातही ५६% वाढ झाली आहे.