यवत : यवत येथील तलाठी कार्यालयालगत असलेल्या एका सरकारी खाणीत अनेक वर्षांपासून कचरा टाकण्यासाठी वापर होत असून याबाबत नुकतेच वार्ड क्र. 2 येथील नागरिकांनी कचराकुंडी हटविण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षे येथे कचरा साठल्याने दुर्गंधी सुटली आहे. आजुबाजूच्या नागरिकांचा जीव गुदमरत आहे तर पावसाळ्यात पाणी साठल्याने या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास मुख्य वस्तीला सहन करावा लागत आहे.
पुणे शहरापासून जवळच असल्याने यवत गावाचे सध्या मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे. येथे होणारे कचरा संकलन दिवसेंदिवस वाढत आहे. घंटागाड्यांच्या मदतीने गावातील कचरा गोळा करून तलाठी कार्यालय शेजारी असलेल्या खाणीच्या खड्डयात कचरा टाकला जातो. परंतु हा खड्डा आता पूर्णपणे भरलेला असून वाऱ्या वादळामुळे हा कचरा आजुबाजूच्या परिसरात पसरत असतो. या कचऱ्यावर तात्काळ प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाठपुरावाही सुरु आहे.
पावसाळा वगळता इतर वेळी हा कचरा पेटवून दिला जात असल्याने धुराचा त्रास देखील आजुबाजूच्या नागरिकांना होत असतो. परंतु हा कचरा आजुबाजूच्या परिसरात पसरत असतो. या कचऱ्यावर तात्काळ प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाठपुरावाही सुरु आहे. पावसाळा वगळता इतर वेळी हा कचरा पेटवून दिला जात असल्याने धुराचा त्रास देखील गावठाणात राहणाऱ्यांना होत असतो. परंतु नुकतेच रुग्णालयातील मेडिकल वेस्ट कचराकुंडीत आढळले असून ईश्वराची उपमा ज्या डॉक्टरांना दिली जाते तेच काही डॉक्टर नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यवत मधील अनेक खाजगी रुग्णालयातील मेडिकल वेस्ट कचऱ्यात दिसून आले आहे. ग्रामपंचायत घंटागाडीत दवाखान्यातील मेडिकल वेस्ट टाकले जात आहे. कचरा असलेल्या ठिकाणी अनेक जनावरे अन्नाच्या शोधात येत असतात. अशावेळी इंजेक्शन, औषधाच्या बाटल्या, सलाईन, गोळ्या असे मेडिकल वेस्ट जनावरांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने या खाजगी रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
पावसाळ्यात ओला झालेल्या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटते तर साठलेल्या पाण्यामुळे डासांचा सामना करावा लागतो तर अनेक वेळा साठलेले पाणी रस्त्यावर येत असल्याने घाणीच्या पाण्यातून जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. अनेकवेळा कचरा पेटवला जात असल्याने नागरिकांना धुराशी सामना करावा लागतो. परंतु सध्या कचऱ्यात मेडिकल वेस्ट आढळणे ही गंभीर बाब असून आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात.
– सुजित गराडे, स्थानिक नागरिककचरा समस्येवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होताच कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे, यापूर्वी देखील खाजगी रुग्णालय प्रशासनाशी याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. लवकरच याबाबत पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.
-समीर दोरगे, सरपंच- यवत