Eknath Shinde News : राज्यात सध्या मराठा आरक्षण तसेच धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. दोन्ही समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. याचा फटका राजकीय तसेच इतर कार्यक्रमांना बसत आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापुजेला विरोध दर्शवला आहे. पंढरपुरात आषाढी एकादशीला येऊ न देण्याचा इशारा दिला त्यांनी दिला आहे.(आषाढी एकादशी)
दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना कार्तिकी एकादशीला विठ्ठल- रुक्मिणीच्या महापुजेसाठी बोलावण्यात यावं. जरांगे पाटलांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापुजा व्हावी. अशी मागणीही जोर धरत असून मराठा क्रांती मोर्चाकडून या मागणीबाबत पत्रही मंदिर समितीला देण्यात आले होते. या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिकी एकादशीला पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे, त्यात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन केलं आहे. (Manoj Jarange Patil)
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
“आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही…” असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.(Eknath Shinde)
तसेच पुढे म्हणाले, “एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा. सारा परिसर जयघोषाने दुमदुमुदे…” असं आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केले आहे.