खेड- शिवापूर, (पुणे) : एक एप्रिलपासून खेड शिवापूर टोलनाक्यावर केलेली टोल दरवाढ लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आली असून, तूर्त जुन्याच दराने टोल आकारणी होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता संपेपर्यंत वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर एक एप्रिलपासून टोलच्या दरात सुमारे अडीच टक्क्याने वाढ करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र सध्या लोकसभा निवडणूक सुरू असून आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलनाक्यावरील केलेली दरवाढ तूर्त स्थगित करण्याच्या सूचना व्यवस्थापनाला दिल्या आहेत. त्यानुसार केलेली दरवाढ स्थगित करण्यात आली असून सध्या जुन्या दरानेच वाहनांना टोल आकारणी करण्यात येत असल्याची माहिती पी. एस. टोल रोडचे विभागीय व्यवस्थापक अमित भाटिया यांनी दिली आहे.
दरवर्षी एक एप्रिलपासून टोलनाक्यावर टोलच्या दरात बदल होतात. त्यानुसार यावर्षी देखील टोलदरात वाढ होऊन सुमारे अडीच टक्के टोल वाढ करण्यात आली होती. टोलचे विभागीय व्यवस्थापक अमित भाटिया यांनी या बाबत माहिती देताना सांगितले की, यावर्षीच्या टोलवाढीस स्थगिती मिळाली असल्याने टोलवर जुन्याच दराने टोल आकारणी सुरू आहे. याची दखल वाहनचालकांनी घ्यावी. तसेच नवीन दरवाढ लोकसभा निवडणूका पार पडल्यावर लागू होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.