उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील तसेच उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत प्रखर झोताचे हायमास्ट दिवे बसविण्याची कामे विद्युत ठेकेदाराच्या माध्यमातून केली गेली आहेत. विजेच्या खांबावर प्रखर झोत दिवे बसवून झाल्यानंतर ते तसेच चालू ठेवून कामगार पुढे निघून जात आहेत. दिवे चालू झाल्यानंतर ते बंद कोणी आणि कसे करायचे, याचे कोणतेही व्यवस्थापन नसल्याचे चित्र या भागात दिसत आहे.
साखरे पंप व दौंडकर वस्ती रस्त्यावरील वीजेचे दिवे मागील आठ दिवसांपासून दिवस-रात्र सुरू आहेत. यामुळे परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्यांमधून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. वीज, पाणी बचत करा म्हणून महावितरण कंपनी, ग्रामपंचायत एकीकडे अभियान राबवीत असताना उरुळी कांचन येथील विद्युत विभाग विजेचा अपव्यय करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. या भागातील ग्रामस्थांनी यासंबंधी वारंवार तक्रारी करूनही पुरेसा प्रतिसाद दिला जात नसल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर देण्यात आली.
कामगार पथदिव्यांच्या खांबावर प्रखर झोताचा दिवा बसवून देतात. दिव्यांची तपासणी केल्यावर ते बंद करण्याची तसदी घेतली जात नसल्याचे या भागातील काही ग्रामस्थांनी सांगितले. रात्रीच्या वेळेत या दिव्यांचा उजेड छान वाटतो. पण दिवसाही हे प्रखर झोताचे दिवे चालू राहत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या दिव्यांबाबत उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन यांना माहिती देण्यात आली होती. तरीही दिवे सुरूच असल्याने स्थानिक नागरिकांनी पंचायतीविषयी नाराजीचा सूर आळवला.
याबाबत बोलताना सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले, ” दिव्यांचे टायमर खराब झाले आहेत. सलग दोन दिवस सुट्ट्या आल्यामुळे बसविण्यात आले नाहीत. पुढील दोन दिवसात बसविले जातील.