केडगाव: दौंड तालुक्यातील देलवडी परिसरात उष्णतेच्या लाटेमुळे कोंबड्यांवर संकट उभे ठाकले आहे. कोंबड्यांतील मानमोडी, उष्मघात, व्हायरल इन्फेक्शन अशा रोगाच्या प्रादुर्भावाने दररोज सात ते आठ कोंबड्या दगावत आहेत. उष्णतेच्या तीव्रतेमुळे हा प्रादुर्भाव वाढला असून, मानमोडी हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे इतरही कोंबड्यांना त्याची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेच्या तीव्रतेने कॅल्शिअम, फॉस्फरस आणि “ड’ जीवनसत्त्व यांची कमतरता यामुळे मानमोडी रोगाचा परिणाम कोंबड्यांवर दिसून येतो. तसेच चांगली शरीरयष्टी असणाऱ्या व जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्यांत या आजाराचे प्रमाण जास्त आढळते. त्यामुळे अंड्यांचे उत्पादन अचानक कमी झाले आहे. मरतुकीचे प्रमाण हे पाच ते सहा दिवसात 70 टक्के एवढे झाले आहे. उष्ण हवामानामध्ये मरतुकीचे प्रमाण वाढते. या आजाराची बाधा झालेल्या कोंबड्यामध्ये झुंगण्याचे प्रमाण वाढून शेवटी कोंबड्या मृत पावतात. पशुसंवर्धन विभागाकडून याबत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे.
या उष्णतेच्या लाटेमुळे आणि व्हायरल इन्फेक्शन यामुळे या कोंबडया मृत्युमुखी पडत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून संबधित प्रकरणाची तत्काळ माहिती दिली आहे. काही मदत मिळेल का यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या परिसरातील नागरिकांनी उर्वरित कोंबड्यांना पोटॅशियम परमॅग्नेट पावडर व ई – केअर सी, हे पिण्याच्या पाण्यातून द्यावे.
-पशुसंवर्धन अधिकारी (देलवडी)