उरुळी कांचन: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आकाशवाणी (हडपसर) ते उरुळी कांचन या दरम्यान मागील दहा वर्षांपासून प्रचंड वाहतूक कोंडी ही प्रवाशांची डोकेदुखी बनली आहे. या दरम्यानचे २० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी नागरिकांना तब्बल २ ते ३ तासांचा कालावधी लागत आहे. या समस्येकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने अद्यापपर्यंत लक्ष दिले नाही. तसेच राज्यासह केंद्रस्तरावर कोणताही पाठपुरावा न केल्याने पूर्व हवेलीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही जैसे थे आहे.
पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजुला अगदी रस्त्यालगत वाढलेली अतिक्रमणे, दोन्ही बाजूला वाढलेली हॉटेल्स, विविध ढाबे, हॉटेलच्या ठिकाणी रस्त्यावर तयार केलेले गतिरोधक, सेवा रस्त्यावर केलेले अतिक्रमण, महामार्गावरच चारचाकी गाड्या थांबवणे, लेनची शिस्त न पाळणे आणि दारू पिऊन गाडी चालविणे अशा विविध गोष्टींमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे.
पुणे सोलापूर महामार्गाच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना होत नसल्याने दिवसेंदिवस या महामार्गाला अतिक्रमणाचा विळखा घट्ट बसल्याने, वाहतूक कोंडीचा प्रश्न नागरिकांसाठी जटील बनला आहे. हडपसर ते उरुळी कांचनपर्यंतचा वीस किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी नागरिकांना तब्बल २ ते ३ तास वेळ लागत आहे. महामार्गाच्या सेवा रस्त्यावर सहानंतर वाहनांच्या रांगा लागत असून सेवारस्त्यावर वाहतुकीचा ताण येऊन वाहतूक कोंडी होत आहे.
आयुक्तसाहेब, अधीक्षक साहेब तुमच्या सर्जिकल स्ट्राईकची नागरिक पाहत आहेत वाट
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शहर व जिल्ह्यातील अवैध धंदे, गुंडगिरीवर सर्जिकल स्ट्राईक करून आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. ही बाब नागरिकांना सुखावणारी आहे. मात्र, शहरातील अवैध धंदे, गुंडगिरीबरोबरच हवेलीच्या पुर्व भागातील नागरीकांना दररोज भेडसावणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी व या कोंडीला कारणीभूत असणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या नाकर्तेपणावर सर्जिकल स्ट्राईक करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
मागील एका वर्षात कवडीपाट ते उरुळी कांचन या दरम्यान झालेल्या विविध अपघातात सत्तरहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुणे-सोलापुर महामार्गावरील कोंडीबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करुनही दाद मिळत नसल्याने नागरिक संतापले आहेत. पुणे शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार व पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची उल्लेखनीय कामगिरी पहाता आमच्याही भागातील अवैध धंदे, गुंडगिरीबरोबरच वाहतूक कोंडीवर आयुक्तसाहेब, तुम्ही सर्जिकल स्ट्राईक खरंच करा हो, अशी म्हणण्याची वेळ पुर्व हवेलीमधील नागरिकांवर आली आहे.
दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हडपसर, शेवाळवाडी, लोणी स्टेशन, कुंजीरवाडी व उरुळी कांचन येथील पुणे-सोलापूर महामार्गावर कुठेही पार्किंग करा आणि बिनधास्त राहा, असे चित्र निर्माण झाले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दुकाने तसेच पथारीवाले, व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे खरेदीदारांची तसेच इतरांची वाहने मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूने पार्क केली जातात. पार्किंग करताना वाहने व्यवस्थितपणे लावली जात नाहीत. त्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
पोलीस हतबल
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक हतबल झाले आहेत. हडपसर, लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीसदेखील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कधी-कधी तर ही कोंडी आवरणे त्यांनाही अवघड होत आहे. शाळा, काॅलेज आणि लहान-मोठ्या कंपन्या सुटण्याच्या वेळेत सर्वांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दररोज होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलीसदेखील हतबल झाले आहेत.
एसटीचे थांबे पुढे घ्यावेत
स्वारगेट येथील एसटी व शेवाळवाडी येथील पीएमपीएमल बस डेपोच्या बसेसला बस थांबा नसल्याने तळवाडी चौकात दोन्ही बाजूंना या बसेस थांबतात. त्यामुळे पाठीमागे असलेली वाहने थांबल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. या बसेस थांबत असलेले थांबे पुढे घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
रिक्षा व टेम्पोसाठी स्वतंत्र वाहनतळाची गरज
हडपसरहून लोणी काळभोरमार्गे यवत, चौफुल्याला जाण्यासाठी तीन चाकी रिक्षा, टेम्पो आणि कारमध्ये देखील बिनधास्त बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू असते. उरुळी कांचन, तळवडी चौकातील रिक्षा व काही टेम्पो हे सेवा रस्त्यावर थांबतात. या रिक्षा व टेम्पो यांना स्वतंत्र वाहनतळ नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे.