हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे) : तहसीलदार कार्यालयाकडून आलेल्या प्रत्येक आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणे प्रत्येक गाव तलाठी कार्यालयावर कायद्याने बंधनकारक असतानाही हवेलीमधील अनेक गाव कामगार तलाठी प्रोटोकॉलसाठी तहसीलदार कार्यालयाच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
पूर्व हवेलीत एका शेतकऱ्याने शासन परिपत्रकानुसार शासकीय तिजोरीत २५ टक्के नजराण्याचे चलन भरल्याने हवेली तहसीलदार कार्यालयाने संबंधित शेतकऱ्याची इतर हक्कातील फेरफार नोंद मालकी हक्कात करण्याबाबतचा आदेश ४ ऑगस्टला दिला होता. मात्र, तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी थेऊर तलाठी कार्यालयाने तब्बल ४० दिवसांचा अवधी घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
दरम्यान, थेऊर तलाठी कार्यालयाकडून घडलेले हे विलंबाचे प्रकरण हिमनगाचा एक छोटासा तुकडा असून, हवेलीत अशी अनेक प्रकरणे प्रोटोकॉलसाठी रखडलेली असल्याचा आरोप हवेलीमधील अनेक शेतकऱ्यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना केला. तर पूर्व हवेलीमधील काही तलाठी कार्यालये खातेदार शेतकऱ्यांची आर्थिक कारणांसाठी अडवणूक करत असल्याच्या चर्चा आमच्याही कानावर आलेल्या असून, थेऊर तलाठी कार्यालय व इतर तलाठी कार्यालयाबाबत काम करण्यास टाळाटाळ होत असल्यास शेतकरी बांधवांनी थेट ग्राहक पंचायतीकडे लेखी तक्रारी कराव्यात, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे हवेली तालुका अध्यक्ष संदीप शिवरकर यांनी केले.
40 दिवसानंतर घेतली आदेशाची दखल..
थेऊर परिसरातील एका शेतकऱ्याने त्यांच्या क्षेत्राची इतर हक्कातील ‘एकत्रिकरण कायद्याविरुध्द व्यवहार’ फेरफार नोंद मालकी हक्कात व्हावी यासाठी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे रितसर अर्ज केला होता. त्यासोबत हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांचाही आदेशसोबत जोडलेला होता. दाखल अर्जाच्या अनुषंगाने टिपणी मंजूर झाल्याने तहसीलदार किरण सुरवसे यांनी संबंधित शेतकऱ्याला शासकीय तिजोरीत जमिनीच्या चालू बाजारभावाच्या 25 टक्के नजराना भरण्यास सांगितले होते. यावर संबंधित शेतकरी बंधूंनी शासन परिपत्रकानुसार शासकीय तिजोरीत 25 टक्के नजराना भरल्याचे चलन जमा केल्यावर हवेली तहसीलदार कार्यालयाने संबंधित शेतकऱ्याची इतर हक्कातील फेरफार नोंद मालकी हक्कात करण्याबाबतचा आदेश ४ ऑगस्टला दिला होता. मात्र, थेऊरच्या गाव कामगार तलाठी सरला पाटील यांनी संबंधित आदेशाची दखल तेही पत्रकार मंडळींनी लक्षात आणून दिल्यानंतर 14 सप्टेंबरला म्हणजे तब्बल 40 दिवसानंतर घेतल्याचे उघड झाले आहे.
…तर मग शासकीय कोषागारात चलन भरुन उपयोग काय?
महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार थेऊर येथील गट नंबर ८५९ बाबत १.७५ आर बाबत खातेदार शेतकऱ्यांने शासकीय बाजारमूल्यांच्या 25 टक्के नजराणा भरुनही सातबारावर अंमलबजावणी होत नसल्याने शासकीय कोषागारात चलन भरुन उपयोग काय? असे खातेदार शेतकरी बोलू लागले आहेत. ‘सेवा हमी कायदा’ कागदावर अस्तित्वात असतानाही विलंबाने कशी अडवणूक केली जाते व तलाठी जाणूनबुजून कशासाठी विलंब लावतात? याविषयी लोक उघडपणे बोलू लागले आहेत.
आदेश टपालात चेक केल्यानंतरच अंमलबजावणी..
याबाबत थेऊरच्या तलाठी सरला पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘तहसीलदारांनी दिलेला आदेश आणखी मी पाहिला नव्हता. हा आदेश टपालात चेक केल्यानंतर त्याची अंमलबजावणी केलेली आहे’.
‘माया’ दिल्याशिवाय काम न करण्याचा जणू रोगच..
पूर्व हवेलीमधील अपवाद वगळता बहुतांश तलाठी व सर्कल कार्यालयात मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांची कामे मध्यस्थ व प्रोटोकॉलशिवाय होत नसल्याचा अनुभव येत आहे. तलाठी कार्यालय असो अथवा सर्कल कार्यालय हजारापासून थेट लाखापर्यंतची माया दिल्याशिवाय काम न करण्याचा रोगच महसूल विभागात जडला आहे. तलाठ्यांना कामाचा सजा मिळवण्यासाठी पाच-पंचवीस लाख रुपये द्यावे लागत असल्याची कबुली तलाठी मंडळी खाजगीत देत आहेत. लोणी काळभोरला मागील वर्षभरापासून पूर्ण वेळ तलाठी न मिळण्याचे तेही प्रमुख कारण असल्याची चर्चा महसूल विभागात आहे.
तलाठ्याच्या नेमणुकीचे कोडे सुटेनासे झालं…
लोणी काळभोरच्या तलाठ्याची नेमणूक नेमकी कोण करते हेच कोडे जनतेला सुटेनासे झाले आहे. पूर्ण वेळ तलाठ्याची मुदतपूर्व बदली, त्याजागी तीस किलोमीटरवरुन आयात केलेले तलाठी, मग त्यांची उचलबांगडी, त्यांच्या जागी पंधरा किलोमीटर अंतरावरील अर्धवेळ तलाठी व त्यानंतर अर्धवेळ तलाठ्याचा चार्ज काढून पुन्हा त्याजागी तीस किलोमीटरवरुन आयात केलेले तलाठी अशी ‘सर्कस’ चालु आहे. हा प्रकार का व कोण करते याबाबतच्या खमंग चर्चा उघडपणे होत आहेत.