दीपक खिलारे..
इंदापूर, (पुणे) : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून येणाऱ्या हंगामात इतर साखर कारखान्याच्या बरोबरीने दर देण्याचा विचार सर्व संचालक मंडळाचा आहे. तसेच येत्या हंगामामध्ये कारखाना शेतकऱ्यांना काटा पेमेंट करणार आहे. त्यामुळे कर्मयोगी परिवारातील शेतकऱ्यांनी योग्य विचार करून सहकार टिकवण्यासाठी कर्मयोगी साखर कारखान्याला चांगले दिवस आणण्यासाठी आपला ऊस द्यावा, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कारखाना सभासदांना केले.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.13) सकाळी कर्मयोगी कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व निरा-भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यावेळी हर्षवर्धन पाटील हे बोलत होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘कर्मयोगी साखर कारखान्याच्या इतिहासात कारखान्याने कधीही सभासदाचा अथवा शेतकऱ्यांचा एक रुपयाही बुडवला नाही. काही लोकांकडून अनेक गैरसमज पसरवण्यात आले. मात्र, त्या लोकांचे पुढे काय झाले हे सर्वांना माहीत आहे. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत कर्मयोगी साखर कारखाना आणि सभासद यांच्या हिताचा निर्णय घेत कारखान्याची प्रगती केली जाईल’, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी सभासदांना दिला.
या ३८ व्या सर्वसाधारण वार्षिक सभेवेळी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी केले. त्यास सभासदांनी हात वर करून मंजुरी दिली. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांच्या मंजुरीनंतर सभासदांनी कारखान्यासाठी काही विधायक सूचना केल्या. त्यानंतर, कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी गाळप हंगामाचा सविस्तर आढावा सादर केला.
या कार्यक्रमाचे आभार कारखान्याचे संचालक राहुल जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी प्रयत्न केले. या सभेस निरा-भिमा साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक स्वप्नील सावंत, अविनाश कोतमिरे, बबन शेटे- पाटील, दादा पिसे, युवा नेते सागर गानबोटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
हर्षवर्धन पाटील यांच्याकडून मोदी-शहांचे आभार..
केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मयोगी कारखान्याला कोणतेही तारण न देता एनसीडीसीमार्फत १५० कोटी रुपये कर्ज दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी आभार मानले.