दौंड: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच आज (दि. ३१) भाजपच्या दौंडमधील जिल्हा अधिवेशनाला पाटील यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना एकच उधाण आले आहे.
दौंडमध्ये शनिवारी भाजपचे जिल्हा अधिवेशन भरवण्यात आले होते. या अधिवेशनाला मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी आणि नेते उपस्थितीत होते. या अधिवेशनासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रण देऊनही त्यांनी दांडी मारली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रण दिल्याचे सांगितले. दौंडमधील भाजपच्या जिल्हा अधिवेशनाला आमदार राम शिंदे, आमदार राहुल कुल, आमदार योगेश टिळेकर यांची उपस्थिती आहे. पण हर्षवर्धन पाटील न आल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात झालेल्या भेटीमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.