इंदापूर : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. 4) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पाटलांच्या या निर्णयामुळे भाजपला इंदापूर मतदारसंघात मोठा फटका बसू शकतो. इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार नसल्याने हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु आहे.
दत्ता भरणेंची पहिली प्रतिक्रया
इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. कारण हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांनी हा निर्णय का घेतला हे त्यांनाच माहिती आहे. अद्यापपर्यंत महायुतीचे जागावाटप झालेले नाही. मला तिकीट मिळणार आहे का नाही? हे मला देखील माहित नाही. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी असा निर्णय का घेतला? हे त्यांनाच विचारावा लागेल, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी इंदापुरात महायुतीची उमेदवारी देखील मिळवली होती. मात्र, त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा जवळपास 2 हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आगामी काळातही दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्येच “काटे कि टक्कर” होणार, असे बोलले जात आहे.
काय म्हणाले शरद पवार?
हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांचं आमच्या पक्षांमध्ये स्वागत करतो. राष्ट्रवादी प्रवेशाचे अशा पध्दतीचे अनेक धक्के येत्या काही काळात दिसून येतील. राष्ट्रवादीची विचारधारा ते मांडत असतील ते केव्हाही पक्षात येऊ शकतात, त्याचे स्वागत होईल, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
म्हणून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतोय : हर्षवर्धन पाटील
इंदापूर विधानसभेची जागा विद्यमान आमदार असलेल्या पक्षाला जाणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसरा पर्याय आपण काढू असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मात्र, दुसरा पर्याय स्वीकारणे आमच्या कार्यकर्त्यांना मान्य झाले नसते. तसे केल्यास तो माझा व्यक्तीगत निर्णय ठरला असता. मात्र, प्रश्न जनतेचा आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेत आहे.
प्रवेश कधी ?
हर्षवर्धन पाटील पुढे बोलताना म्हणाले, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात माझा प्रवेश कधी होईल? हे माझ्या हातात नाही, पवार साहेबांनी आपल्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध आहेत. येणाऱ्या काळात राजकिय वनवास राहणार नाही. नवीन विकासाचे पर्व सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आपला रोल फक्त पक्षात प्रवेश करणं आहे, बाकीचा रोल त्यांचा आहे, तारीख त्यांची असेल, असंही हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.