लोणी काळभोर, (पुणे) : हर.. हर.. महादेव, बम.. बम.. भोले, च्या जयघोषात पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडीसह परिसरातील महादेव मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शनिवारी (ता. १८) करण्यात आले होते.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीगावामध्ये पांडवकालीन महादेव मंदिरात पहाटे चार वाजता शिवलिंगाला अभिषेक घालून सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. पाच वाजता काकड आरती, आठ वाजता गणपती पूजन जोशी काका यांच्या हस्ते करण्यात आली. तर उद्या रविवारी (ता.१९) सकाळी आठ ते दोन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन कवडी गाव, माळवाडी महाशिवरात्री उत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कदमवाकवस्तीचे माजी उपसरपंच देविदास कदम, ज्ञानेश्वर चांदणे, रोहिदास भोसले, कुमार कदम, माऊली खोले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोणी काळभोर येथील रामदरा शिवालय येथे पहाटे पूजा, भजन, पालखी मिरवणूक यासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. लोणी काळभोर मधील प्राचीन शिवालय मंदिरात शिवभक्तांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
पहाटे तीन वाजता महादेवाला अभिषेक करून पूजा करण्यात आली. सकाळी नऊ वाजता तुलसी रामायणाचा पाठ झाला. तर महिला भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे आयोजन लोणी काळभोर येथील प्राचीन शिवालय सेवाधाम निकेतन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कुंजीरवाडी येथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील महादेव मंदिरात शिवभक्तांनी शांततेत दर्शन घेतले.
थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील काकडे मळा येथील महादेव मंदिरामध्ये सकाळी सात वाजता महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालून पूजा करण्यात आली. सकाळी अध्यात्मिक रहस्य सांगण्यात आले. दहा वाजण्याच्या सुमारास परिसरातील भजनी मंडळांचा कार्यक्रम झाला.
तर सायंकाळी सात वाजता महाआरती व प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आयोजित शिव महात्म्य आधारित प्रवचन व भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन श्री शंभू महादेव सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, रुपचंद बोडके, श्री शंभू महादेव सेवाभावी ट्रस्टचे विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, लोणी काळभोरसह परीसरामधील महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांना केळी, चिवडा, लाडू आणि खिचडी वाटप करण्यात आले. लोणी काळभोर पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.