मंचर, (पुणे) : मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
पवन सुधीर थोरात (वय 24, रा. चाळीस बंगला रोड, मंचर, ता. आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस व दुचाकी असा 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्या होत्या. शुक्रवारी (ता. 08) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सराईत गुन्हेगार पवन थोरात हा त्याच्या ताब्यात असलेले एक गावठी पिस्टल कमरेला लावून मोटरसायकलवर बसून नारायणगाव-मांजरवाडी रोडला येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले. तसेच त्याच्याकडून मोटार सायकलसह एकूण 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी पवन थोरात याच्याविरोधात खूनाचे 02 गुन्हे, खुनाचा प्रयत्न, मारामारी, आर्म अॅक्ट अंतर्गत एकूण 09 गुन्हे दाखल असून त्याचेवर यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत देखील कारवाई करण्यात आली.