लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी परिसरात अर्धा एकर शेतातील ऊसासहित ठिबक सिंचन जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ही घटना शॉर्टसर्किटमुळे झाल्याचा आरोप करत शेतकऱ्याने महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. नागेश निवृत्ती काळभोर (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नागेश काळभोर यांची रायवाडी परिसरात गट क्र. ४२२ मध्ये अर्धा एकर शेती आहे. या शेतात त्यांनी ऊसाची लागवड केली होती. शेतातील ऊस गाळप आणि तोडणीच्या अंतिम टप्प्याच्या प्रतिक्षेत उभा होता. दरम्यान, या शेतीतून महावितरणच्या वीजवाहक तारा गेल्या आहेत. या तारांमधून शॉर्टसर्किट झाल्यामुळे ऊस जाळून खाक झाला असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
नुकसान भरपाईची मागणी
शेतातील अर्धा एकर ऊस आणि ठिबक सिंचन जळून आर्थिक नुकसान झाल्याने महावितरणने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी नागेश काळभोर यांनी केली आहे.