उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर येथील मांजरी फाटा (१५ नंबर) ते उरुळी कांचनदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकीरण झाले आहे. परिणामी, महामार्गावरील मुख्य चौकांमध्ये प्रचंड कोंडी होते. अपघात टाळण्यासाठी व गावातील नागरिक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान उड्डाणपूल उभारण्यासह ठिकठिकाणी असलेल्या चौकात विविध उपाययोजना करण्याची मागणी पूर्व हवेलीतील नागरिक करू लागले आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान मांजरी बुद्रुक येथे बाजार समितीसमोर, शेवाळेवाडी, फुरसुंगी फाटा, लोणी स्टेशन, कुंजीरवाडी व उरुळी कांचन गावातील जुन्या एलाईट चौकात व तळवाडी चौकात वाहतुकीची कोंडी होणे, ही बाब नित्याचीच झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
लोणी काळभोर, उरुळी कांचन ही गावे ‘शैक्षणिक हब’ म्हणून विकसित झाल्याने येथे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या परिसरामध्ये मंगल कार्यालये अधिक असल्याने लग्नसराईच्या काळात वाहतूक कोंडी होते. उसाचा हंगाम चालू असतो, त्या काळात कोंडीत सातत्याने भर पडते.
पोलिसांनी तातडीने कारवाई करावी
उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकीत अपवाद वगळता बाराही महिने अठरा तास वाहतूक कोंडी आढळून येते. या चौकात रस्त्यातच अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षा, मोठी वाहने, खासगी वाहने थांबतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा सेवारस्ता हा टपरी चालक व हातगाड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे पायी चालणेही जीवावर बेतू शकते. मात्र, स्थानिक दुकानदारांच्या दबावापोटी पोलीस कारवाई करत नाही आणि लोकप्रतिनिधी लक्ष घालत नसल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
उरुळी कांचन येथील एसटी व पीएमपीएमलचे थांबे पुढे घ्यावेत
स्वारगेट एसटी व शेवाळवाडी येथील पीएमपीएमल बस डेपोच्या बसेसला बसथांबा नसल्याने तळवाडी चौकात दोन्ही बाजूंना या बसेस थांबतात. त्यामुळे पाठीमागे असलेली वाहने थांबल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. या बसेस थांबत असलेले थांबे पुढे घ्यावे.
दिशादर्शक फलक लावणे गरजेचे
सोलापूर रोड व नगर रोड यांना जोडणारा जेजुरी-उरुळी कांचन-पाबळ-बेल्हे राज्यमार्ग क्रमांक ६१ हा उरुळी कांचन जवळील कोरेगाव मूळ येथून जात असल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी वाढली आहे. हा रस्ता माहिती नसल्याने या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीने किंवा उरुळी कांचन ग्रामपंचायतीने दिशादर्शक फलक लावावे.
गुगल मॅपची दिशाच चुकीची
उरुळी कांचन गावातील रेल्वेच्या पुलाखालून फक्त चार चाकी वाहने जात आहेत. या ठिकाणावरून मोठ्या वाहनांना जाता येत नाही. मोठी वाहने या रस्त्याने गावात आली की त्यांना परत वळण्यासाठीही गावामधील अरुंद रस्त्यावर जागा उपलब्ध नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. इतकेच नाहीतर गुगल मॅपवरही चुकीची दिशा दाखवली जात आहे.
पोलीस प्रशासनाने द्यावे लक्ष
पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कुंजीरवाडी व उरुळी कांचन येथील पुणे-सोलापूर महामार्गावर कुठंही पार्किंग करा आणि बिनधास्त राहा, असे चित्र निर्माण झाले आहे. तसेच उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढत आहे. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दुकाने तसेच पथारीवाले, व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे खरेदीदारांची तसेच इतरांची वाहने मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूने पार्किंग केली जातात. पार्किंग करताना वाहने अस्ताव्यस्तपणे लावली जातात. त्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
रिक्षा व टेम्पोसाठी स्वतंत्र वाहनतळाची गरज
हडपसरहून लोणी काळभोरमार्गे यवत, चौफुल्याला जाण्यासाठी तीन चाकी रिक्षांपासून टेम्पो आणि कारमध्ये देखील बिनधास्त बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू असते. उरुळी कांचन, तळवडी चौकातील रिक्षा व काही टेम्पो हे सेवा रस्त्यावर थांबतात. या रिक्षा व टेम्पो यांना स्वतंत्र वाहनतळ नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे.