Hadapsar News : हडपसर, (पुणे) : डेंग्यू आणि मलेरियावर सीरम इन्स्टिट्यूट लस बनवणार असून डेंग्यूवरची लस वर्षभरात बाजारात येणार असल्याची घोषणा सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी केली आहे. पुण्यात एका खासगी कार्यक्रमात सायरस पुनावाला यांनी ही घोषणा केली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट लस बनवणार
देशात सध्या डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र यावर कोणताही रामबाण उपाय नाही. त्यामुळे अनेकदा नागरिकांची तब्येत खालावते परिणामी मृत्यूदेखील होतो. हीच बाब लक्षात घेत आता सीरम इन्स्टिट्यूट डेंग्यू आणि मलेरियावर लस बाजारात आणणार आहे. त्यामुळे आता डेंग्यू आणि मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होणार आहे. येत्या वर्षभरात डेंग्यूवरची लस बाजारात उपलब्ध होणार आहे तर मलेरियावरची लस बाजारात येण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे.
“कोविड लशीच्या यशानंतर आम्ही डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवणार आहे. या लसीची नितांत गरज आहे. आफ्रिक देशात आणि भारतात डेंग्यू आणि मलेरियाची साथ कायम येते. यावर उपाय आहेत मात्र ठोस अशी लस नाही त्यामुळे आम्ही ही लस तयार करणार आहोत,” असे पुनावाला यांनी म्हटले. या लसीमुळे डेंग्यूचे चारही प्रकार बरे होण्याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. Hadapsar News
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट लवकरच लस बाजारात आणण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. काही लसींमुळे महिलांच्या गर्भाशयावर परिणाम होतो. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशी ही लस असणार असल्याची महत्वपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली.