लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर पंधरा नंबर ते उरुळी कांचन या 20 किलोमीटर अंतराच्या टप्प्यात वाहतूक कोंडी व छोटे-मोठे अपघात घडणे ही नित्याचीच बाब झाली आहे. हडपसर, लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलिसांकडे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. असे असताना देखील वाहतूक पोलिस चौकात थांबत नसल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतुकीचे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत. त्यामुळे कोणी निंदा कोणी वंदा, वाहतुकीचे अनियमन हाच वाहतूक पोलिसांचा स्वहिताचा धंदा आहे का? अशी म्हणण्याची नागरिकांवर वेळ आली आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन दरम्यानची वाहतूक कोंडी सोडविण्याची जबाबदारी हडपसर, लोणी काळभोर व उरुळी कांचन या तीन पोलीस ठाण्यांची आहे. या मार्गावरील वाहतूक नियमन करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांच्या नेमणुका केल्या आहेत. पुणे प्राईम न्यूज ने केलेल्या पाहणीतून हडपसर १५ नंबर, साडेसतरा नळी, कवडीपाट टोलनाका, लोणी स्टेशन, एमआयटी कॉर्नर, थेऊर फाटा, कुंजीरवाडीतील नायगाव फाटा, उरुळी कांचन येथील तळवाडी चौक या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्त्यव्य बजाविताना दिसतात.
वाहतूक पोलीस काही चौकात सकाळी आठ, तर काही चौकात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाहतूक नियमन करण्यासाठी हजर राहतात. यानंतर कर्तव्य बजावीत असल्याचे दाखवून महाशय एक सेल्फी काढतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवितात. त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जी कलटी मारतात. ते डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून मस्तपैकी संध्याकाळी सात वाजेपर्यंत चौकात फिरतात. मात्र, वाहतूक कोंडी सोडविण्याकडे बिनधास्त दुर्लक्ष करतात.
पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजुला वहातुक कोंडी होत असल्याचे चित्र नित्याचेच झाले आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वाहतूक पोलिस व त्यांचे वरीष्ठ अधिकारी जागे होणार का? असा सवाल पूर्व हवेलीतील नागरिकांनी केला आहे. तसेच वाहतूक विभाग यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर व लोणी स्टेशन चौकात रिक्षा रस्त्यावरच लावल्या जातात. त्यामुळे महामार्गावर वारंवार अपघात होतात. एमआयटी कॉर्नरच्या चौकात मालधक्क्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक पुणे-सोलापूर महामार्गावर येते. महामार्गाकडे येताना चढ असल्याने चौकात नेहमी वाहतूक कोंडी होते. या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांकडून चिरीमिरी घेऊन गप्प झाले का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
‘पुणे प्राईम न्यूज’कडून पाहणी
रविवारी (ता. 2) सकाळचे ९ वाजले होते. लोणी स्टेशन चौकात वाहन चालक आपल्या मर्जीने गाडी चालवीत होते. त्यानंतर त्या चौकात वाहतूक नियमन करण्यासाठी दोन पोलीस कर्मचारी आले. पोलिसांनी दुपारी बारा वाजेपर्यंत कर्तव्य बजावले. त्यानंतर जेवणासाठी एक वाहतूक पोलीस घरी गेला. तो घरी पोहचण्याच्या अगोदरच, दुसऱ्यानेही कलटी मारली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक महाशय आले. तर दुसरे महाशय सहा वाजण्याच्या सुमारास आले. तर एमआयटी चौकात वाहतूक पोलिसच दिसून आला नाही. त्यामुळे पोलिसांना १२ तासाच्या ऐवजी कामाचे ५ तास करण्यात आले आहेत का? असा सवाल ‘पुणे प्राईम न्यूज’ने वाहतूक पोलिसांना केला आहे.
…तर पोलीस नेमकं करतात तरी काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या ठिकठिकाणी नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. वाहतूक पोलीस सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जर उपाययोजना करत नसतील, तर पोलीस करतात काय? त्यामुळे ‘वाहतूक पोलीस आहेत नावाला, काम करतात कुण्या गावाला? असं म्हणण्याची वेळ येथील स्थानिक नागरिकांवर आली आहे.
आडोसा किंवा ‘सुरक्षित’ ठिकाणीच बस्तान..
सध्या बहुतांश चौकात वाहतूक पोलिस हे वाहतूक नियमन सोडून आडोशाला थांबत असल्याचे चित्र आहे. इतकेच नाही, तर काही वाहतूक पोलिस हे दुचाकी किंवा बाकड्यावर बसल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. जर वाहतूक पोलिसच अशाप्रकारे ‘सुरक्षित’ जागा शोधत असतील, तर सर्वसामान्यांसह वाहनचालकांची सुरक्षा रामभरोसेच, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.