हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या सराईत एका गुन्हेगाराला कोल्हापूर मध्यवर्ती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. राजू हनुमंत गायकवाड (वय ३९, रा. लेन नं. ७ कॅनॉल शेजारी, गंगानगर, हडपसर) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहर पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची १०० वी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील ४ वर्षात राजू गायकवाड याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात विविध ७ गुन्हे दाखल आहेत. सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक असलेली कृत्ये करत होते. तसेच सर्वसामान्य नागरिकांना धमकी देणे, शिवीगाळ करणे, वेळप्रसंगी मारहाण करुन आपली जबरदस्त दहशत निर्माण करणे अशा विघातक कृत्यांमुळे व गुंडगिरीमुळे लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या अनुषंगाने हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके व पी. सी. बी. गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंद्रकांत बेदरे यांनी सदर गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्याकडे पाठविला असता पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी राजू गायकवाड यास कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहेत.
ही कामगिरी रविंद्र शेळके, चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाचक शाखा गजानन पवार, पी.सी.बी गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक राजू बहिरट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, शेखर कोळी, वाचक शाखा, दिलीप झानपुरे, पोलीस अंमलदार, योगीराज घाटगे, अविनाश सावंत, संतोष कुचेकर, सागर बाबरे, अनिल भोंग यांनी केली आहे.