पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात मोठी कारवाई केली आहे. नऱ्हे भागात एका गोदामावर पुणे पाेलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकत १ कोटी ३९ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. एकाच ठिकाणी असलेल्या गुटखा कारखाना आणि गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकला आहे. पोलिसांनी गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. तसेच एका आरोपीही शोध पोलीस घेत आहेत.
पुष्पेंद्र अकबाल सिंग (वय २७, रा. नऱ्हे, मूळ रा. उत्तरप्रदेश), सुनील पथ्थन सिंग (वय ४५, रा. नऱ्हे, मूळ. रा. उत्तर प्रदेश), मुकेश कालुराम गेहलोत (वय २८, रा. आंबेगाव, मूळ. रा, राजस्थान), चंदन अजयपाल सिंग (वय ३२, रा. नऱ्हे, मूळ. रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरोपींचा साथीदार निलेश ललवानी (वय ४०, रा. नऱ्हे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो पसार झाला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध अन्नसुरक्षा मानदे कायदा अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, राज्यात गुटखा बंदी असतानाही सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे भागातील गोदमात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा करण्यात आला होता. तसेच गोदामातून शहर परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना गुटखा विक्रीस पाठविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते.
शनिवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभाग, तसेच गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १ कोटी ३९ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.