उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील वळती शिंदवणे परिसराला पावसाने चांगलेच झोडपले. विजांच्या कडकडाटासह रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पूर्व हवेलीत तासभर झालेल्या वळिवाच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे पडली असून वादळी वाऱ्यामुळे विजेचे पोलही जमीनदोस्त झाले आहेत, तर ताराही तुटल्याच्या घटना घडल्या आहेत.
अचानक ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही वेळातच सोसाट्याच्या वादळ वाऱ्यासह विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट होऊन पाऊस पडायला सुरुवात झाली. जवळपास अर्धा ते एक तास झालेल्या पावसात काही ठिकाणी सुपारी एवढ्या तर काही ठिकाणी हरभऱ्याच्या दाण्या इतका गारांचा पाऊस पडला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असल्या तरी सुदैवाने कोठेही जीवितहानी झाली नाही. विजांसह पाऊस कोसळणार हा हवामान विभागाचा अंदाज आज खरा ठरला. विद्युत तारा तुटल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या वादळी पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली.
लोणी काळभोर परिसरातील रामदरा परिसरात व आळंदी म्हातोबा येथील रस्त्यावर मोठे बाभळीचे झाड पडून वाहतूक कोंडी झाली होती. तर आळंदी म्हातोबाची या ठिकाणी २ चारचाकी गाड्यांवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहाणी झाली नसली तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तासभराच्या मॉन्सूनपूर्व पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचन व परिसरात पावसाचे वातावरण झाले. साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत जोराचा पाऊस सुरू झाला आणि अशाच वातावरणात वाऱ्याचा जोर अधिक असल्यामुळे झाडांच्या फांद्या व झाडे रस्त्यावर पडली. अनेकांच्या घरांच्या छत्रावरील पत्रे उडून गेले. अशाच वातावरणात सुरू असलेली पुणे – सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही क्षणात ठप्प झाली होती.
दरम्यान, पूर्व हवेलीतील वळती येथे मुख्य रस्त्यावरच रोहित्र पडल्याने तसेच विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील कोरेगाव मूळ हद्दीतील इनामदार वस्तीवर लाईटचा पोल पडला आहे. त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. अचानक आलेल्या वादळी पावसाने सर्वच ठिकाणे दाणादाण उडवून दिली आहे.