दीपक खिलारे / इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शेटफळ हवेली गावच्या हद्दीत पाठलाग करत १९ लाख ९२ हजार ६१५ रुपये किंमतीचा १३२ किलो ८४१ ग्रॅम वजनाचा गांजा पकडला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक केली असून २३ लाख २२ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.
नवनाथ राजेंद्र चव्हाण (वय ३० वर्ष, रा. शेटफळ, हवेली, ता. इंदापूर, जि. पुणे) व शिवाजी जालींदर सरवदे (वय-३० वर्ष, रा. निरा नरसिंहपुर, ता. इंदापूर, जि. पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई २६ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार गणेश डेरे यांना शेटफळ हवेली गावच्या हद्दीत दोन इसम हे एका मालवाहतूक टेम्पो मधून विक्रीसाठी गांजा घेवून येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. त्यांनी ती माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना दिली. कोकणे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत व गुन्हे शोध पथकाच्या पथकाला संपूर्ण कल्पना देवून कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत आरोपींकडून १९ लाख ९२ हजार ६१५ रुपयांचा गांजा, ३ लाख रुपये किमतीचा मारूती सुझुकी कंपनीचा सुपर कॅरी मॉडेलचा नंबर नसलेला माल वाहतूक करणारा टेंपो, ३० हजार रुपयांचे दोन मोबाईल, असा एकूण २३ लाख २२ हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.
ही कामगिरी इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते, फौजदार पुंडलिक गावडे, सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, फौजदार दत्तात्रय लेंडवे हवालदार सलमान खान, अंमलदार गणेश डेरे, तुषार चव्हाण, अंकुश माने, विशाल चौधर, गजानन वानोळे यांनी केली.