Gram Panchayat Election Result 2023 : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी युती केल्यानंतर राज्याची राजकीय समीकरणे बदलत गेली. सत्तांतरानंतर प्रथमच अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यामध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची महायुती आणि शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस महाविकास आघाडी या दोन्हींपैकी कोणत्या विचाराच्या ग्रामपंचायतीच्या पॅनलला मतदान केले जाते याकडे सर्वांचे लक्ष होते. अनेक गावांमध्ये शरद पवार यांच्या पदरी निराशा आली. हवेली तालुक्यात मात्र शरद पवार यांच्या पॅनलला पसंती मिळाल्याचे दिसून येत आहे. गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
पुणे जिल्ह्यातील मुदत संपणार्या २३१ पैकी १८६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर १४२ पैकी ३१ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. सार्वत्रिक निवडणुकीत ८०.५२ टक्के इतके, तर पोटनिवडणुकीत ७९.६८ टक्के इतके मतदान झाले. आज हवेली तालुक्यातील कोलावडे साष्टे, खामगाव मावळ येथील मतमोजणी मामलेदार कचेरी येथे पार पडली. निवडणुकीत हवेली तालुक्याने महायुतीला नाकारत शरद पवारांच्या विचाराच्या पॅनलला मतदान केल्याचे पाहायला मिळाले. पेठ २ सदस्य पदासाठी पल्लवी सूरज चौधरी, आळंदी म्हटोबा १ सदस्य पदासाठी शंकर शिवाजी जवळकर आणि हिंगणगाव १ सदस्य पदासाठी मंगल थोरात हे विजयी झाले आहेत.