पुणे : जुन्नर येथे शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार करून, बनावट दस्ताऐवज करून राखीव वन जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जुन्नर बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांच्यासह पत्नी, मुलगा आणि दस्तनोंदणी अधिकाऱ्यांसह अकरा जणांविरोधात जुन्नर वन विभागाने फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून जुन्नर पोलिसांनी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी वनविभागाकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून संबंधिताविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्यासंबंधी कळविले होते. याप्रकरणी केलेल्या चौकशीत कुरण येथील नविन गट नंबर ४४२ व ४५४ (जुना सर्व्हे नं ९६) तसेच नवीन गट नंबर ४५२ (जुना सर्व्हे नं ९५) चे ‘राखीव वन’ दर्जा असलेल्या जमिनीचे गैरव्यवहार प्रकरणात बनावट दस्ताचे आधारे दस्तनोंदणी झाल्याचे तसेच बनावट अधिसूचनेचा वापर करून राखीव वनजमीन हस्तांतरण व्यवहार झाल्याचे आढळून आल्याने फिर्याद दिली आहे.
महसूल विभागाकडून अरुण देशमुख यांना हे राखीव वनक्षेत्र उपजीविकेसाठी शेती प्रयोजनार्थ वाटप झाले होते. या बाबतच्या महसूल विभागाच्या अटी व शर्तींचा भंग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वन जमिनीच्या बनावट दस्तांच्या आधारे वन विभागाची फसवणूक जुन्नर, कुरण, पिंपळवंडी, वानेवाडी येथील व्यक्ती तसेच तत्कालीन दुय्यम निबंधक व पुराभिलेख संचालनालयातील तत्कालीन कर्मचारी या शासकीय कर्मचाऱ्यांनी केली असल्याचे चव्हाण यांना चौकशीत आढळून आले आहे.
कुरण येथील दोन्ही गट नंबरच्या दस्तनोंदणी गैरव्यवहारप्रकरणी अरुण देशमुख, अलका लेंडे, शुभांगी देशमुख, अनिकेत लेंडे, शकुंतला गणेशकर, रोहन गणेशकर, रघुनाथ लेंडे, तत्कालीन सहायक संचालक, पुराभिलेख संचालनालय, मुंबई येथील अज्ञात व्यक्ती तसेच नारायणगावचे तत्कालीन दुय्यम निबंधक यांच्याविरुद्ध वन विभागाच्या जमिनीची फसवणूक आणि बनावट दस्ताच्या आधारे अपहार करून गैरलाभ घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.