पुणे : पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला जीपीएस यंत्र लावून तिचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बारामतीतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लखन महादेव भिसे (वय २५ रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे) असं गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार शुक्रवार पेठेतील एका सोसायटीत राहायला आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी भिसे तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने तरुणीवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या नकळत दुचाकीला जीपीएस यंत्र लावले. त्यानंतर भिसे हा तरुणीवर पाळत ठेवत होता. तिचा चोरून पाठलाग करायचा. तरुणीच्या हा प्रकार लक्षात आला. तेव्हा तिने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक स्वाती भोरड पुढील तपास करत आहेत.