पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे काल राजगुरुनगर (ता. खेड) येथे आले होते. हुतात्मा राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपले जुने सहकारी कै. बाळासाहेब आपटे यांच्या वाड्यास आवर्जून भेट दिली व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
हुतात्मा राजगुरुंच्या वाड्याला भेट दिल्यावर राज्यपालांचा ताफा आपटे वाड्यात दाखल झाला. राज्यपालांनी आपटे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. आपटे यांच्या पत्नी ऊर्मिला, मुलगी जान्हवी केदारे, व स्मृती समितीच्या सदस्यांनी राज्यपालांचा यावेळी सत्कार केला. यावेळी राज्यपालांनी आपटे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
राज्यपाल कोश्यारी राजगुरुनगर येथे येणार असल्याचे समजल्यावर स्व. बाळासाहेब आपटे स्मृती समितीच्यावतीने राज्यपालांना पत्र पाठवून आपटे वाड्यास भेट देण्याची विनंती केली. राज्यपालांनी त्या पत्राला होकार दिला होता.
बाळासाहेब आपटे भाजपकडून दोनदा राज्यसभा खासदार झाले होते, त्यांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद भूषविले होते. तसेच देशभर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कार्य केले. २०१२ मध्ये त्यांचे निधन झाले. राज्यपाल कोश्यारी हे पक्षात व राज्यसभेत त्यांचे समवयस्क सहकारी होते.