हडपसर : लोणी काळभोर परिसरात दरोड्याच्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर सराईत गुन्हेगारांनी मिरवणूक काढल्याची घटना मांजरी परिसरात घडली आहे. त्यानंतर पोलिसांकडून सराईतासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी ऋषिकेश कामठे (रा. महादेवनगर, मांजरी), त्याचे साथीदार गणेश शिंदे, रोहन शिंदे, अक्षय कांचन, प्रतीक कांचन, प्रकाश होले यांच्यासह १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हडपसरमधील मांजरीतील महादेवनगर भागात १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. पोलीस कर्मचारी उमेश शेलार यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश कामठे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर आणि हडपसर पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी, दरोडा, तसेच लूटमार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याने हॉटेल व्यावसायिकाला धमकावून लुटले होते. त्या प्रकरणात ऋषिकेश कामठेसह साथीदारांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कामठेसह साथीदारांना २७ जुलै २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात नुकताच कामठे याला जामीन मिळाला. कामठे आणि साथीदारांनी जामीन मिळाल्यानंतर मांजरीतील महादेवनगर परिसरात मिरवणूक काढून जल्लोष केला. मिरवणूक काढत आरोपींनी यावेळी परिसरात दहशत माजविली.
विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांनी शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कामठेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.