Pune News : पुणे शहरात मे महिन्यापासून पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र, धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. यामुळे पुण्यातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. दरम्यान ६ आठवड्यानंतर पुन्हा एकदा आढावा घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.(Pune News)
पुण्यातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये अपुरा पाणीसाठा असल्याने पुणे महापालिकेकडून शहरात पाणीकपात लागू करण्यात आली होती. आता शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २२ अब्ज घनफूट (टीएमसी), म्हणजे ७५ टक्के पाणीसाठा झाल्याने शहरात दर आठवड्याला होणारी पाणीकपात उद्यापासून (सोमवार) रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर उपस्थित होते.(Pune News)
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला असल्याने शहरातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील एकत्रित पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. असे असतानाही पुणेकर मात्र दर गुरुवारच्या ‘पाणी बंद’मुळे हैराण झाले असून, ही पाणीकपात रद्द करावी, अशी आग्रही मागणी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सत्ताधाऱ्यांकडे लावून धरली होती. पालकमंत्री पाटील यांनी या पार्श्वभूमीवर तातडीची आढावा बैठक घेऊन पुणेकरांची पाणी कपातीतून सुटका केली आहे.(Pune News)
महापालिका खडकवासला आणि भामा आसखेड या दोन धरणांतून दररोज सुमारे १६५० ‘एमएलडी’ इतके पाणी उचलते. या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुणेकरांना पिण्यासाठी, वापरासाठी देण्यात येते. दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने सुमारे पाव ‘टीएमसी’ पाण्याची महिन्याभरात बचत करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पुणेकर गेल्या अडीच महिन्यांपासून पाणीटंचाईला सामोरे जात होते. पाणी कपात गुरुवारी करण्यात येत असली, तरी त्याचा परिणाम पुढील दोन दिवसांच्या पुरवठ्यावर होत होता. त्यामुळे प्रत्यक्षात आठवड्यातील तीन दिवस पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर पाणीसाठा ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने पाणीकपात तातडीने रद्द करावी, अशी मागणी राजकीय क्षेत्राबरोबरच स्वयंसेवी संस्थांकडूनही करण्यात आली होती.(Pune News)
या वेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, वर्षभरात पिण्याचे पाणी व शेतीसाठी साधारण ३० ‘टीएमसी’ पाण्याची आवश्यकता असते. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा हा गतवर्षीपेक्षा अधिक आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. शेतीसाठी लागणारे पाणीही देण्यात यावे; तसेच धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले तलावही भरण्यात यावेत. येत्या काळात पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील.(Pune News)