पुणे : दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणेकरांची फराळासह, विद्युत रोषणाईसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठी घाईगर्दी दिसू लागली आहे. बाजारपेठा अगदी गजबजून गेल्या आहेत. सकाळ, दुपार, संध्याकाळ खरेदीदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगाने कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांना मनमोकळी दिवाळी खरेदी करता यावी यासाठी पुण्यात काही उपाययोजना केल्या जाणार आहे.
सणावारानिमित्त लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, मंडई, शनिपार, तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. अनेकजण टू व्हीलर घेऊन इथं येतात, रस्त्यावर बेशिस्तपणे वाहनं लावलेली दिसून येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्यावरून चालणंसुद्धा कठीण होऊन बसतं. या पार्श्वभूमीवर मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत 21 ऑक्टोबरपासून बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे. दरम्यान, हे वाहतूक बदल 5 नोव्हेंबरपर्यंत लागू असणार आहेत.
‘हे’ असतील वाहतूक बदल..
- छत्रपती शिवाजी रस्त्यावर येणाऱ्या चारचाकी वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) वळून जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जावं.
- स्वारगेटकडून बाजीराव रस्त्यानं येणाऱ्या चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या वाहनांनी टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून डावीकडे वळून टिळक रस्ता, टिळक चौकमार्गे इच्छित स्थळी जावं.
- अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) येणारी वाहतूक गरज भासल्यास बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे वाहनचालकांनी बाजीराव रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जावं. तसंच फुटका बुरुज चौकातून जोगेश्वरी मंदिराकडे येणारी वाहतूक गरज भासल्यास बंद केली जाणार आहे.
- शनिपार चौकातून मंडईकडे जाणारी वाहतूक, कुमठेकर रस्त्यावरून मंडईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
पार्किंगची सुविधा
लक्ष्मी रस्त्यासह मध्य भागात खरेदीसाठी येणाऱ्या वाहनचालकांनी मंडईतील वाहनतळ, नारायण पेठेतील हमालवाडा आणि नारायण पेठेतील साने वाहनतळावर वाहनं लावावी, असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केलं आहे.