पुणे : पुणे हे देशातील आकाशवाणीचे सर्वाधिक श्रोते असलेले शहर आहे. तसेच आकाशवाणीचे पुणे केंद्र हे आकाशवाणीचे जाहिरातींच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे केंद्र होते. असे असूनही दोन वर्षांपूर्वी पुण्यासह महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांची सायंकाळची प्रसारण निर्मिती बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. पुणेकर श्रोत्यांनी याविरोधात लढा उभारला होता. या लढ्याला अखेर यश आले आहे. आकाशवाणी पुणे केंद्राचे सायंकाळचे स्थानिक प्रसारण आता ७ एप्रिलपासून पूर्ववत सुरू होणार आहे. आकाशवाणीच्या वरिष्ठ पातळीवरून नुकतीच यासाठी अनुमती मिळाली आहे. आता पुण्यातील श्रोत्यांना त्यांच्या आवडीचे युववाणी, हॅलो आपली आवड, नभोनाट्य, लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, कौटुंबिक श्रुतिका इत्यादी सायंकाळचे स्थानिक कार्यक्रम पुन्हा ऐकण्यास मिळणार आहेत.
१९५३ सालापासून आकाशवाणीचे पुणे केंद्र कार्यरत आहे. मात्र, प्रसार भारतीच्या एका धोरणात्मक निर्णयामुळे दोन वर्षांपूर्वी पुण्यासह महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांची सायंकाळची प्रसारण निर्मिती बंद करून, त्याऐवजी त्यांना मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करण्याचे आदेश देण्यात आले होते. आकाशवाणीच्या स्थानिक कार्यक्रमांची निर्मिती कमी केल्यामुळे स्थानिक कलाकार, विचारवंत तसेच आकाशवाणीचे नैमित्तिक उद्घोषक यांना मिळणाऱ्या संधी कमी झाल्या होत्या. त्या निर्णयाला आकाशवाणीच्या श्रोत्यांनी आणि स्थानिक कलाकारांनी विरोध केला होता.
स्थानिक श्रोते आणि कलाकारांच्या भावना पुणे केंद्रातील अधिकाऱ्यांकडूनही वरिष्ठांना वेळोवेळी कळविल्या जात होत्या. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. ७ एप्रिलपासून आकाशवाणी पुणे केंद्राचे सायंकाळचे प्रसारण पूर्ववत करण्याच्या प्रस्तावाला वरिष्ठांनी अनुमती दिली.
याबाबत आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल म्हणाले की, आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने सायंकाळचे स्थानिक प्रसारण सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला होता. त्याला परवानगी मिळाली आहे. त्यानुसार ७ एप्रिलपासून आकाशवाणी पुणे केंद्राचे सायंकाळचे स्थानिक प्रसारण आम्ही सुरू करणार आहोत.