पुणे : भारतीय डाक विभागातर्फे जिल्हास्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात ६ व ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. यामध्ये विविध स्तरावर पुरस्कार प्राप्त तिकीट संग्राहकांनी संग्रह केलेली दुर्मिळ टपाल तिकिटे व इतर टपाल सामुग्री प्रदर्शित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामुळे ‘फिलाटेली’चा (टपाल तिकिटांचा संग्रह) छंद जोपासण्याची तसेच प्रदर्शन पाहण्याची सुवर्णसंधी पुणेकरांना विशेषतः लहान मुलांना मिळणार आहे.
प्रदर्शनस्थळी विविध ‘फिलाटेली’ची तिकीटे विक्रीसाठी उपलब्ध असतील. तसेच ‘माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत स्वतःचे फोटो असलेले टपाल तिकीट तयार करून घेण्याची विशेष व्यवस्था प्रदर्शनस्थळी उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनात एकूण ७५ फ्रेम्स प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
प्रदर्शनादरम्यान ‘विशेष टपाल तिकीट’ तसेच ‘पिक्चर पोस्ट कार्ड’चे अनावरण करण्यात येणार आहे. लहान मुलांमध्ये टपाल तिकीट संग्रह करण्याची वृत्ती वृद्धींगत व्हावी यासाठी विविध वयोगटानुसार टपाल तिकीट डीझाईन, पत्रलेखन, रांगोळी व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत १० ते १५ वयोगटातील विद्यार्थी, १६ ते २१ वयोगटातील तरुण आणि २१ वर्षांवरील प्रौढ सहभागी होऊ शकतात. प्रत्येक विभागातील विजेते राज्यस्तरीय टपाल तिकीट प्रदर्शनात सहभाग घेऊ शकतील, अशी माहिती पुण्याचे पोस्टमास्टर जनरल आर. के. जायभाये यांनी दिली. या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा मुख्य उद्देश ‘राजांचा छंद आणि छंदांचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘फिलाटेली’बद्दल जागरूकता निर्माण करणे हा असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरावर टपाल तिकीट प्रदर्शन आयोजित करणे हा ‘फिलाटेली’मध्ये स्वारस्य निर्माण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. त्याद्वारे संग्राहकांना त्यांचे संग्रह प्रदर्शित करण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी आणि तरुणांना या आकर्षक छंदाकडे आकर्षित करण्यासाठी मंच प्रदान करणे हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे. पुणेकरांनी तसेच विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन पुण्याचे पोस्टमास्टर जनरल आर. के. जायभाये यांनी केले.
‘फिलाटेली’ हे भावी शैक्षणिक साधन
टपाल तिकिटे वेगवेगळ्या देशांद्वारे त्यांचा वारसा, निवासस्थान, इतिहास, कला, साहित्य आणि संस्कृती चित्रित करण्यासाठी वापरली जातात. टपाल तिकिटे भविष्यासाठी मौल्यवान ऐतिहासिक दस्तऐवज देखील प्रदान करतात. भूतकाळातील आणि वर्तमानातील यशाला प्रतिकात्मक मान्यता देण्यासाठी आणि व्यक्ती, संस्था आणि संस्थांना सन्मानित करण्यासाठी हे एक साधन म्हणून उदयास आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. लहान मुलांच्या आणि तरुणांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आणि त्यांची सर्जनशीलता जागृत करण्यासाठी एक प्रभावी शैक्षणिक साधन म्हणून ‘फिलाटेली’चा वापर वाढत आहे.