पुणे : पुण्यातील नामवंत गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांच्या नियुक्तीवरून होणाऱ्या आरोपांवर संस्थेचे कुलपती डॉ. राजीव कुमार यांनी रानडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावत उत्तर मागितले आहे. रानडे यांनी नियुक्तीच्या वेळी आवश्यक पात्रतेच्या निकषांबद्दल फसवणूक करणे, तसेच महत्त्वाची माहिती लपविणे, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) आणि राज्य सरकार यांच्याशी तथ्यांची चुकीची मांडणी करणे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर रानडे यांनी सर्व आरोप फेटाळत नोटिसीला उत्तर दिल्याचे सांगण्यात येते. रानडे यांची कुलगुरुपदी नियुक्ती झाल्यापासूनच त्यांच्या नियुक्तीला विरोध झाला आहे. कुलगुरुपदाचे निकष डावलून रानडे यांची नियुक्ती झाल्याचे सांगण्यात येते. संस्थेमध्ये अनावश्यक पदे निर्माण करत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप रानडे यांच्यावर आहे. मुरली कृष्णा यांनी माहिती अधिकारातून ही माहिती उघड केली आहे.