पुणे : पुण्यातील दिवे घाट पायथ्याशी असलेल्या वडकी गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हडपसर-सासवड रस्त्यावरील दिवे घाट पायथ्याशी स्फोट घडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ६७ जिलेटिनच्या कांड्या सापडल्या आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाँम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळावरुन जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी गावातील गावदरा वस्तीत ६७ जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. गावदरा वस्तीजवळ मोठा डोंगर आहे. त्या ठिकाणी कांड्या सापडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी बाॅम्ब शोधक नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करून जिलेटिनच्या कांड्याची तपासणी करण्यात आली.
दरम्यान, नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. जिलेटिन कांड्यांचा वापर खोद काम करण्यासाठी केला जातो. प्रामुख्याने खोल खड्डे, तसेच विहिरी खोदण्यासाठी या जिलेटिन कांड्याचा वापर केला जातो.