लोणी काळभोर : जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. हे थेऊर (ता. हवेली) येथील शेतकरी ज्ञानेश्वर चंद यांची कन्या गायत्री हिने सिद्ध करून दाखविले आहे. गायत्रीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर गगनभरारी घेतली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन 2024 साली पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आयोगाच्या वतीने बुधवारी (ता.1 ऑगस्ट) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत गायत्री चंद यांनी उत्तीर्ण होऊन गरुडझेप घेतली आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले-मुली लाखो रुपये भरून क्लास लावतात. परंतु, गायत्री चंद यांनी कोणताही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता घरीच अभ्यास केला. पहिले तीन वेळा अपयश आले, मात्र चौथ्या प्रयत्नात यश मिळविले. त्याच्या या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे.
गायत्रीचे वडील ज्ञानेश्वर चंद यांची थेऊर परिसरात शेती आहे. शेतीवर चंद कुटुंबाचा आर्थिक गाडा हाकला जातो. गायत्रीची आई पुष्पा या गृहिणी आहेत. ज्ञानेश्वर चंद यांना गायत्री, गीता, वैष्णवी या तीन मुली व मुलगा सिद्धेश्वर अशी अपत्ये आहेत. गायत्रीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण थेऊर तारूमळा येथील प्राथमिक शाळेतून घेतले. चिंतामणी माध्यमिक विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाली. तर हडपसर येथील एस एम जोशी महाविद्यालयातून वाणिज्य विभागातून पदवी प्राप्त केली. तर गायत्रीची बहीण गीता हिनेही वाणिज्य विभागातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. तर छोटी बहीण वैष्णवी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. तर भाऊ सिद्धेश्वर हा अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
गायत्रीने लहानपणीच आपण मोठे अधिकारी होऊन प्रशासकीय सेवेत काम करावे, असे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न गायत्रीला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यानंतर गायत्रीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सन 2020 साली करण्यास सुरवात केली. गायत्रीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. परंतु यशाचा रस्ता थोडासा खडतर होता. अंतिम यश हे थोड्या थोड्या गुणांनी हूलकावणी देत होते. मात्र गायत्री अपयशाने खचली नाही. जिद्द, मेहनत, संयम, चिकाटीच्या जोरावर पुन्हा जोरदार अभ्यास केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे.
दरम्यान, शेतकरी कन्या गायत्री चंद यांनी पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थिती नसताना गायत्री चंद यांनी यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गायत्रीच्या यशाबद्दल जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक, शासकीय क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
या यशाचे खरे मानकरी माझे आई-वडील, बहिण व मित्रपरिवार आहेत. या सर्वांनी मला नेहमी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे यश मी त्यांना समर्पित करतो. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये, त्या अपयशाला अभ्यासाच्या परिश्रमाची जोड द्या. त्यानंतर तुम्हीही यशाचे शिखर गाठून नक्की अधिकारी बनू शकता.
– गायत्री चंद ( पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण)