राजगुरुनगर, (पुणे) : रात्रीच्या वेळी रस्त्यालगत उभ्या केलेल्या वाहनांमधील डिझेलची चोरी केली जात होती. ही डिझेल चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आळेफाटा पोलिसांनी आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून तब्बल 17 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कुणाल रोहिदास बोंबले, ओमकार काळुराम देवकर, राहुल संजय हिंगे (सर्व रा. राजगुरुनगर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन कार व डिझेल असा एकूण 17 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (ता.३) रात्रीच्या वेळी भोसले पेट्रोल पंपासमोर असलेल्या ट्रान्सपोर्ट ऑफिससमोर उभ्या असलेल्या हायवामधून 60 लिटर डिझेल चोरीला गेले होते. याप्रकरणी रुपेश ज्ञानेश्वर वाळूंज यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली होती. तसेच त्याच रात्री बाह्यवळण पुलाजवळ लावलेल्या योगेश पाडेकर व सुदर्शन जाधव यांच्या वाहनामधून डिझेल चोरी झाली होती.
याप्रकरणाचा तपास करत असताना आळेफाटा पोलिसांना राजगुरुनगर येथील तिघेजण वाहनांमधील डिझेल चोरी करत असल्याची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार, तपास पथकाने राजगुरुनगर येथे आरोपींचा शोध घेऊन तिघांना ताब्यात घेतले. आरोपींनी आळेफाटासह मंचर, पारगाव कारखाना हद्दीत वाहनामधून डिझेल चोरल्याचे कबुल केले आहे. त्यांच्याकडून 575 लिटर डिझेल व गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार असा एकूण 17 लाख 52 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, ही कामगिरी पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे, पोलीस अंमलदार विनोद गायकवाड, भीमा लोंढे, पंकज पारखे, अमित माळुंजे, हनुमंत ढोबळे, प्रवीण आढारी, नवीन अरगडे यांच्या पथकाने केली.