उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल सोनाई व्हेज व हॉटेल गारवा हॉटेलच्या पाठीमागील वसाहतीत मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी कामगार राहत असलेल्या ठिकाणी कडी-कोयंडे तोडून प्रवेश केला. पण त्यांच्या हातात काहीच मिळाले नाही. हे चोरटे धारदार शास्त्रासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ मागील महिन्यापासून सुरु आहे. उरुळी कांचन येथील किराणा दुकान फोडल्याची घटना तसेच लोणी काळभोर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरडे ग्रामपंचायत हद्दीतील गणपती मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटनाहि सीसीटीव्हीत कैद झाली होती. आता तर थेट बंद सदनिकांचे कडी-कोयंडे तोडून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक अस्वस्थ झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल सोनाईच्या पाठीमागे असलेल्या ढगे मळा परिसरात कपडे तयार करणाऱ्या कारखान्यातील काही कामगार राहण्यास आहेत. या वसाहतीत दोन सदिनिका असून त्यातील दोन सदनिकांमध्ये काही कामगार राहतात. शनिवारी (ता. २४) दोन कामगार हे कामानिमित्त गावी गेले होते. यावेळी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
दरम्यान, या घरात त्यांना काहीही मिळाले नसले तरी घरातील काही साहित्याचे चोरट्यांनी नुकसान केले आहे. वसाहतीतील चोरी झाल्यानंतर धारदार शस्त्रे, कटावणी व काळे जॅकेट, तोंडाला मास्क लावलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे दिसून येत आहेत. यामध्ये साडेपाच फूट उंची, वय अंदाजे २५ ते ३० वयोगटातील चोरटे या सीसीटीव्हीत दिसून येत आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. फोड्या आणि दरोड्यांच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
पोलिसांची गस्त वाढवणार
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची घटना घडली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार असून, लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये.
– शंकर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन, (ता. हवेली)
चोरट्यांचा बंदोबस्त करावा
उरुळी कांचन पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली पाहिजे व अशी धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा.
– महेश गायकवाड (ढगे मळा, उरुळी कांचन, ता. हवेली)