उरुळी कांचन (पुणे) : लहानापासून ते वडीलधार्या सर्वांचाच लाडका असणार्या गणपती बप्पांची जयंती मंगळवारी (ता. १३) पूर्व हवेलीत मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. ‘जय गणेश जय गणेश जय गणेश देवा…’असा गणेश महिमा गात लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
अष्टविनायकापैकी एक असणार्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. श्रींची पूजा करून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे पुजारी आगलावे यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते. देवस्थान व आगलावे बंधूंतर्फे मंदिर प्रांगणात मांडव घालण्यात आले होते. दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि पिंपरी सेरोलोजिकल ब्लड सेंटर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
दुपारी देवस्थानतर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. दिवसभर भाविकांची गर्दी कमी जास्त होत होती. सायंकाळी पाच वाजले नंतर दर्शनाला येणार्या भक्तांची गर्दी वाढली.ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच देवस्थानच्या वतीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहांची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थानचे विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस लक्ष ठेवून होते.चिंचवड देवस्थान ट्रस्ट वतीने माघी गणेश उत्सव साजरा करण्यात आला.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आश्रम रोडवरील गणपती मंदिरात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जन्मकाळ सोहळा पार पडला. यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. यावेळी महात्मा गांधी तरुण मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, तरडे येथील गणेश जयंती निमित्त भैरवनाथ युवा मित्र मंडळ ट्रस्ट जगताप मळा तरडे यांच्या वतीने ह.भ.प. कबीर महाराज अत्तार यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.