पुणे: पुणे शहरात आणि परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना असलयाचे दिसून येत आहे. त्यातच जानेवारीच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची कोथरूडमधील घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांचे नाव समोर आले. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरात पुन्हा टोळीयुद्धाचा उडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या कामाचा धडाका सुरु केला आहे. त्यांनी शहरातील गुन्हेगारांच्या तपासण्या करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे शहरातल्या सर्व गुन्हेगारांची पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात धिंड काढण्यात आली. शहरातील सर्व गुन्हेगारांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करत ही परेड झाली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सदर कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ आणि आंदेकर यांच्यासह रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पोलीस मुख्यालयात हजेरी लावली. यावेळी या गुन्हेगारांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून सज्जड दम भरण्यात आला आहे.
कोण कुठे सक्रिय आहे आणि कोण कुठल्या कारवाया करतो किंवा कोण गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय नाही, अशी यादी बनवण्याचं काम गेल्या तीन दिवसांपासून पुणे पोलीस करत होते. त्यानंतर शहरातील सर्व टोळ्यांचे प्रमुख, टोळीचे सदस्य अशा सर्वांना पुणे पोलिसांनी बोलावले होते. या सर्वांना बाहेर उभं करून त्यांची नावे पोलीस स्टेशनच्या हद्दीनुसार वाचून दाखवली जात आहेत. सध्या कोण काय करत आहे? राहण्यास कुठे आहे? कोणी गैरप्रकारांमध्ये सहभागी आहे का? याची खातरजमा गुन्हे शाखेकडून सुरू आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यादीप्रमाणे गुन्हेगारांची पडताळणी करत आहे.
यापुढे गुन्हेगारी कारवाया केल्या तर तुमची खैर नाही, असा इशारा पुणे पोलिसांकडून या गुन्हेगारांना देण्यात येत आहे.
दरम्यान सोमवारी ५ फेब्रुवारीलाच शहरातील अवैध धंद्यांविरोधात एकप्रकारे मोहीम सुरु केली आहे. शहरातील पब रात्री दीडनंतर पूर्णपणे बंद राहणार असून, कोणाला जर प्रेमाची भाषा समजत नसेल तर त्यांनी त्यांचा आगीसोबत खेळण्याचा शौक पूर्ण करावा, असा सज्जड दमच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.