शिरूर, (पुणे) : परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून पसार असलेल्या गुन्हेगारास एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूसासह अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे (अन्वेषण) शाखेच्या ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (ता. 08) शिरुर बायपास रोडवर सुनिल वडेवाले टपरी जवळ हि कारवाई केली आहे.
निखिल सतीश थेऊरकर (वय -21, रा. कर्डे, ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा 41 हजार मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना पथकाला त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी निखिल थेऊरकर हा शिरुर बायपास रोडवर सुनिल वडेवाले टपरी जवळ उभा असून कंबरेला गावठी पिस्टल लावले आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन पंचांसह छापा टाकून निखिल थेऊरकर याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगाची अंगझडती घेतली असता, त्याचे कंबरेला एक गावठी पिस्टल व मॅग्झीनमध्ये दोन जिवंत काडतुस असा 41 हजार मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.
दरम्यान, निखिल थेऊरकर याच्यावर परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता. तसेच शिरूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा अवैध गावठी पिस्तुल बाळगण्यामागे नेमका कोणता हेतू आहे. याकरीता त्यास न्यायालयात हजर करण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी मिळाली आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे यांनी केली असून पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.