लोणी काळभोर (पुणे) : “स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने श्री शिवनेरी गड (ता. जुन्नर) ते श्री पुरंदर गड (ता. पुरंदर) या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभुराजे भेट पालखी सोहळ्याचे स्वागत कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन येथे सोमवारी (ता. ८) जल्लोषात करण्यात आले. या वेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “छत्रपती संभाजी महाराज की जय”, “जय शिवराय” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
लोणी स्टेशन चौकात पालखी रथाचे आगमन झाले. या वेळी कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर, उद्योजक सचिन काळभोर, रूपराज काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वराज्य संघाचे अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर, पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ज्ञानोबा कुंजीर, हवेली तालुका पालखी सोहळा संघटक लक्ष्मण चव्हाण यांचे स्वागत केले. या वेळी परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील सहा वर्षांपासून पालखी सोहळा सुरु करण्यात आला आहे. पालखी सोहळ्याचे ध्येय व उद्दिष्ट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती देणे, शिवचरित्राचा प्रसार करणे, शिवरायांचे पराक्रम, रयतेसाठी राबवलेल्या विविध योजना अशी अनेक प्रकारची माहिती या वेळी देण्यात येत आहे.
दरम्यान, उपस्थित मान्यवरांचा नंदू काळभोर, सचिन काळभोर व रुपराज काळभोर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालखी हडपसरच्या दिशेने मार्गस्थ झाली.