उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोधे-काकडे वस्ती परिसरात सणासुदीच्या तोंडावर वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. जंम्प तुटणे, रोहित्र गरम होऊन बंद पडणे त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित होत आहे.
वारंवार होणाऱ्या ‘ब्रेक डाऊन” मुळे जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्येक दिवशी बत्ती गुलचा खेळ सुरू आहे. याकडे महावितरण कंपनीच्याउपकार्यकारी अभियंत्यांनी दुर्लक्ष केले आहे. वीज बिल वसुलीसाठी मात्र वीज कर्मचारी ग्राहकांकडे तगादा लावत आहे. महावितरण कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे कोरेगाव मूळ व परिसरातील जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या उपकेंद्रात वारंवार ‘ब्रेक डाऊन’होण्याचे प्रमाण वाढले आहे. उपकेंद्रात वेळेवर मेंटेनन्सची कामे केली जात नसल्याने ‘ब्रेक डाऊन’होण्याचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा जनतेत सुरू आहेत. सणासुदीच्या तोंडावर धार्मिक वातावरण निर्माण झाले असताना महावितरण कंपनी या आनंदावर विरजण घालत असल्याचा प्रकार सुरू आहे. उपकार्यकारी अभियंता व वीज कर्मचाऱ्यांना विचारले असता वीज पुरवठा खंडित का झाला, याची माहिती आपल्याला नसल्याचे सांगत आहेत. यामुळे नेमका वीज पुरवठा सुरू होण्यास किती वेळ लागेल याची माहिती मिळत नाही.
पाऊस असो अथवा नसो गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील वीज पुरवठा दिवसा व रात्री सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून परिसरातील शालेय विद्यार्थी, महिला व नागरिक हे वारंवार वीज जात असल्यामुळे त्रस्त झाले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन वीज पुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, वीज बिलाच्या युनिटच्या दरामध्येही वाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांची वीज बिलाची रक्कमही आता वाढली आहे. विविध प्रकारचे आकार वीज बिलात लावण्यात येते. वीज बिलाची रक्कम थकित झाल्यास कर्मचारी वसुलीसाठी ग्राहकांच्या दारात उभे असतात. सर्वसामान्य वीज ग्राहक नियमित वीज बिलाचा भरणा करतात, यामुळेच महावितरण कंपनीचा आर्थिक डोलारा सुरू आहे, याची जाणीव महावितरण कंपनीने ठेवणे गरजेचे आहे.
वारंवार होत असलेल्या कमी-जास्त दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे घरातील लाखो रुपयांची विद्युत उपकरणे जळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपासून विजेचा पुरवठा अचानक कमी जास्त दाबाने होत असल्याने माझा घरचा एक लाख रुपयांचा टीव्ही जळाला आहे. तसेच फ्रिज, फॅन, मिक्सर आदी उपकरणे जळाली आहेत. महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही गोष्ट सांगितली असता, अधिकारी मात्र दखल घेत नाहीत.
-मुकिंदा काकडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, कोरेगाव मूळ, (ता. हवेली)
“कोरेगाव मूळ हद्दीतील बोधे – काकडे वस्तीवरील रोहित्राच्या असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी वायरमनला माहिती देण्यात आली आहे. तसेच काही वायरी जळालेल्या अवस्थेत आहेत. त्याची किरकोळ व मोठी दुरुस्ती करण्यात येईल. आज दुपारपर्यत सदरचे काम सुरु करण्यात येईल.
-रमेश वायकर, सहायक अभियंता, महावितरण, उरुळी कांचन, (ता. हवेली)