उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या लोणीकंद-उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर रस्त्याची रुंदी पूर्वीपेक्षा दुप्पट झाल्याने वाहने वेगाने धावतात. त्यामुळे वारंवार या रस्त्यावर अपघात होत आहेत. या मार्गांवर रिफ्लेक्टर लावणे, पांढरे पट्टे मारणे, गतिरोधक करणे, माहितीफलक बसविणे, वाळू साफ करणे ही कामे तातडीने करावी, अशी मागणी वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धिविनायक हॉस्पिटल परिसरातून वाहने सुसाट धावत असून, या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या ठिकाणावरून जेजुरी, सासवड, शिंदवणे घाटाकडे जाणाऱ्या अवजड व हलक्या वाहनांची संख्या मोठी आहे. तसेच याच ठिकाणावरून पेट्रोल, डिझेलच्या टँकरची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी लहान-मोठे अपघाताचे सत्र सुरूच आहे.
या मार्गाने पायी चालत जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. विशेषतः या ठिकाणी सोसायट्या, हॉस्पिटल, उरुळी कांचन या ठिकाणी शिंदवणेसह परिसरातील विद्यार्थी या ठिकाणी शाळेत येतात. यावेळी या शाळेतील मुले रस्ता ओलांडून जात-येत असतात. या भरधाव वाहनांमुळे त्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत. त्यामुळे वाहनांचा वेग मर्यादित राहून संभाव्य अपघाताची संख्या रोखण्यात यश येईल.
वाहने धावतात सुसाट
रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहने सुसाट धावत असतात. वाहनांना वेगमर्यादा नसल्यामुळे शिंदवणे परिसरातील वाकवस्ती परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नुकताच दुचाकीचा अपघात झाल्याने दोन युवक व एक महिला गंभीर जखमी झाला होता. रहदारीच्या रस्त्यावर दुचाकी व इतर वाहने चालवताना नियमांचे पालन होत नसल्याने अपघाताच्या घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, शिंदवणे येथे तीव्र वळण आहे. येथे विरुद्ध बाजूने येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे वाहनाचा वेग कमी करण्याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. परिणामी, प्रामुख्याने गुरुवार, शनिवार व रविवारी या परिसरात वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
रस्ता ओलांडताना येतात अडचणी
रस्ता रुंद झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. शाळेतील मुलांना, ज्येष्ठ नागरिक, महिलांना रस्ता ओलांडताना अडचणी येतात. गावाच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारावेत. पर्यटकांना गाव, शाळा, वळण, अरुंद रस्ता याची माहिती नसते. याची माहिती व फलक बसवावेत.
– सचिन विठ्ठल महाडिक, शिंदवणे, ता. हवेली.
गतिरोधक बसवण्याची केली जातीये मागणी
या रस्त्यावरील सिद्धिविनायक हॉस्पिटल परिसरात गतिरोधक बसवावेत, अशी मागणी उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या वतीने सदर ठेकेदाराला निवेदन देण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले नाहीत.
– आदित्य कांचन, सामाजिक कार्यकर्ते, उरुळी कांचन, ता. हवेली
लवकरच निर्णय घेतला जाणार
‘जेजुरी-उरुळी कांचन-शिंदवणे यामार्गावर मोठ्या प्रमाणात गतिरोधक बसविण्यात आले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात एक समिती आहे, या समितीशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे’.
– प्रदीप लवटे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग