वडगाव मावळ, (पुणे): दीड वर्षांपूर्वी विजेचा धक्का लागून शिरगाव (ता. मावळ) येथील मयत झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना महावितरणकडून चार लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी महावितरणकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांना महावितरणकडून प्रतिसाद मिळाला नाही. आमदार सुनील शेळके यांनी आमसभेत मयत शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी केली असता, महावितरणने याची तात्काळ दखल घेत नुकसानभरपाई जमा केली आहे.
शिरगाव येथे राहणारे राजाराम वामन गोपाळे (वय 65) हे 17 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता महावितरणच्या तुटलेल्या तारांचा स्पर्श त्यांच्या पायाला झाला. त्यानंतर जोरात विजेचा धक्का बसून ते खाली कोसळले. शेतातून बराच वेळ घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी सुमन या शेतात शोधण्यास गेल्या असता त्यांना ते चिखलात पडल्याचे दिसले. बेशुद्ध अवस्थेत असलेले राजाराम गोपाळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गोपाळे यांच्या कुटुंबियांना महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत होती. परंतु दीड वर्ष महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारुन देखील त्यांची दखल घेतली जात नव्हती. अखेर 15 फेब्रुवारी 2024 रोजी आमदार सुनिल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेमध्ये मयत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी मदत करण्याची मागणी केली होती. आमदार सुनिल शेळके यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबाला लवकरात लवकर मदत करण्याची कार्यवाही करावी,अशा सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, शुक्रवार 22 मार्च 2024 रोजी महावितरणने सुमन गोपाळे यांच्या खात्यामध्ये चार लाख रुपये वर्ग करुन नुकसान भरपाई अदा केल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी दिली.