दौंड : पुणे सोलापूर महामार्गावर पाटस पोलीस चौकीच्या हद्दीत बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन परप्रांतीय तरुणांना पाट्स पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकीसह अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता पोलिसांनी याप्रकरणी आणखी चौघांना ठाणे आणि धुळे येथून अटक केली आहे.
अमित कुमार रामभाऊ यादव (वय 31), बिहार, सध्या रा.कोंढवा, पुणे व राकेश चंद्रशेखर यादव (वय – 42, बिहार, हल्ली रा. पाटस ता. दौंड जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या परप्रांतीय आरोपींची नावे आहेत. तसेच भावेश संतोष पाटील (वय-24, रा. भिवंडी जि. ठाणे), नयन धनाजी चौधरी ( वय-21, रा. तुलई मुरबाड जि.ठाणे), भावगीर उर्फ महेश छोटुगीर गोसावी (वय 30 कांतीनगर शिरपुर जि. धुळे), संजय भगवान निकुंभे ( वय 49, रा. कांतीनगर शिरपुर जि. धुळे) या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींना गुरुवारी दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार (ता. 07) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान शेख यांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता आरोपींनी त्यांचे अधिक साथीदार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी आणखी चौघांना ठाणे आणि धुळे येथून अटक केली.
दरम्यान, या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून बनवट नोटा छापून त्याची महाराष्ट्रासह परराज्यात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून बनावट नोटा छपाई करणारे मोठे रॉकेट असल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. काही वर्षांपूर्वी दौंड शहरात बनावट नोटा छपाई प्रकरणी काही जणांवर कारवाई केली होती. दौंड तालुक्यात एवढ्या मोठ्या बनवट नोटा आल्या कुठून? आत्तापर्यंत या बनावट नोटांचा किती ठिकाणी वापर करण्यात आला? तालुक्यात बनावट नोटा छापणारा रॉकेट आहे का ? यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे का ? अशी शक्यता वर्तवली जात असून पोलीसांनी त्या अनुषंगाने तपास करण्याची मागणी होत आहे.