लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महादेव मंदिरालगत असलेल्या रस्त्यावर तरससदृश जंगली प्राणी फिरताना आढळल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच, आता लोणी काळभोर पोलिसांना गस्त घालताना तरस आढळला आहे. सलग आठ दिवसांच्या आत गावातील अंबरनाथ मंदिराजवळ तरस फिरताना आढळल्याने लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित पिंजरा लावून तरसचा बंदोबस्त करावा, अशी मागणी लोणी काळभोरकरांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, हवालदार गोरवे त्यांच्या सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता.१९) गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांनी शनिवारी (ता.२०) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ मंदिराजवळ असलेल्या रस्त्यावरच तरस प्राणी दिसला. तेव्हा तरस हा पक्षाची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करत होता. पोलिसांच्या गाडीचा उजेड पाहिल्यानंतर त्याने पळ काढला. पोलिसांनी गाडीने त्याचा पाठलाग केला. मात्र, तो गल्लीबोळीतून पळून गेला.
नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले असता त्यांना कॅमेरात तरस प्राणी असल्याचे आढळून आला. तर याचा सलग दुसरा व्हिडिओ लोणी काळभोरसह परिसरात तूफान व्हायरल झाला आहे. तसेच सलग आठ दिवसांच्या आत दोनदा तरस प्राणी भरवस्तीत वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच भविष्यात तरसकडून लोकांवर हल्ला होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच पिंजरा लावून त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.
लोणी काळभोरच्या चारही बाजूंनी वनक्षेत्र
लोणी काळभोरच्या चारही बाजूंनी वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात अनेक प्राणी राहतात. त्यातीलच एक तरस नावाचा प्राणी नागरिकांना आढळला आहे. तरस हा श्वान प्रकारातील प्राणी आहे. मृत प्राणी आणि शिळे अन्न खाऊन तो जीवन जगत असतो. तो एक स्वच्छता कर्मचारी म्हणून निसर्गात काम करत असतो. हा वन्यजीव सहसा माणसावर हल्ला करत नाहीत. माणसापासून सुरक्षित अंतर पाळत असतात. माणूस त्यांच्याजवळ आला तर ते स्वरक्षणासाठी हल्ला करतात.
नागरिकांनो, घाबरून जाऊ नका
लोणी काळभोर गावामध्ये दोनदा तरस प्राणी दिसल्याचे खरे आहे. तरस हा प्राणी जंगलात राहत असला, तरी तो भित्रा प्राणी आहे. तो बिबट्या किंवा वाघासारखा हिंस्त्र प्राणी नाही. तरस हा रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडत असतो. त्याने अद्यापही कोणावर हल्ला केला नाही. तो नैसर्गिक जीवन जगत आहे. त्यामुळे नागरिकांनो घाबरून जाऊ नका. जर त्याच्याकडून एखादे हिंस्र कृत्य घडले तर त्याला ताबडतोब पिंजरा लावून जंगलात सोडून देऊ. तसेच पुढील आठ दिवसांच्या आत तरसाच्या संदर्भातील समज व गैरसमज दूर करण्यासाठी लवकरच लोणी काळभोरमध्ये मार्गदर्शन शिबीर घेणार आहे.
– मंगेश सपकाळे, वन परिमंडळ अधिकारी, लोणी काळभोर.