राजेंद्रकुमार शेळके
Former Students Get Together : जुन्नर : शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी मनसोक्त गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र ओझर येथील २००३ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे…
श्री विघ्नहर विद्यालयात अतिशय खेळीमेळीच्या व मंगलमय वातावरणात हा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, गणेश पूजन व राष्ट्रगीताने करण्यात आली. यानंतर सर्वानुमते माजी शिक्षक गोरे यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सर्वांचा परिचय देऊन, विद्यालयातील सर्व शिक्षकांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला. आपापल्या जीवनात यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपला परिचय गुरुजनांना करून दिला.
माजी विद्यार्थ्यांनी पोलीस खाते, शैक्षणिक खाते, वैद्यकीय खाते, सामाजिक, राजकीय, कृषी, गृह खाते, बँकिंग, बांधकाम विभाग, ज्वेलरी इत्यादी अनेक क्षेत्रांत आपले जीवन यशस्वी केले आहे. या स्नेह मेळाव्यासाठी १०६ विद्यार्थ्यांपैकी ५० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमादरम्यान एक आठवण म्हणून प्रतिकात्मक आकर्षक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील दहा गरजू, गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा मानस या वेळी सर्वच विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
गुरुजन देवडे, लोहोटे, गोरे, पानसरे, राऊत, मुख्याध्यापक दांगट व शिपाई पंडित यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, पुढील यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रफुल्ल कवडे, रोहिदास कवडे, देवेंद्र टेंभेकर, विनायक टेंभेकर, डॉ. स्मिता कवडे, डॉ. पराग पडवळ, आयटी इंजिनीअर प्रदीप घेगडे, उद्योजक वैभव कवडे, बँक मॅनेजर मयूर मांडे, आर्किटेक्चर दीपक कवडे, प्रसिद्ध प्रगतिशील शेतकरी ईश्वर गायकर, सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत शेळके, उर्मिला चव्हाण-ढोले, भीमराव गुंजाळ, धीरज कर्डक, प्रशांत शेळके व सर्वच विद्यार्थ्यांनी विशेष असे परिश्रम घेतले. रुचकर अशा स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.