-दीपक खिलारे
इंदापूर : सखाराम गेला की तुकाराम येतोय, तुकाराम गेला की सखाराम येतोय यातच होरपळून चाललेल्या इंदापुरातील जनतेला प्रवीण माने यांच्या रुपाने सक्षम पर्याय मिळाला आहे, त्यामुळे त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुर पाटील म्हणाले.
अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या गणेशवाडी येथील कोपरा सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना मयुर पाटील म्हणाले की, निरा व भीमा या दोन्ही नद्यांच्या कडेला ऊसाची मुबलक शेती असणारा परिसर आहे. पाण्याचे योग्य नियोजन झाले तर येथील शेतकरी सोने पिकवतो हे सर्वांना माहिती आहे. तथापि जुन्या नेत्यांकडून या भागाचा फक्त मतांसाठी वापर झाला. निरा भीमा संस्था सोडली तर मागील पंधरा वीस वर्षांपासून विकासाचे कोणते काम या भागात झालेले नाही. कोणता मोठा उद्योग व्यवसाय आला नाही. संस्था निघाल्या नाहीत. आपण मागे पडतो आहोत, अशी भावना येथील लोकांमध्ये बळावत चालली आहे. बेरोजगार युवकांचा हाताला काम हवे आहे, असे ते म्हणाले.
या भागातील सहकार क्षेत्राच्या नाड्या विशिष्ट लोकांच्या हातात गेल्या आहेत. त्या त्यांच्याकडून बाजूला काढता आल्या तरच लोक आपल्याला समर्थन देतील. त्यासाठी खाजगी उद्योगाबरोबरच सहकार क्षेत्रातील उद्योग येथे उभा करावा लागणार आहे, असे पाटील म्हणाले. दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल असणा-या सोनाई उद्योग समुहाचे प्रमुख दशरथ माने यांच्यासारखे लोक आपल्या पाठीमागे ताकदीने उभे राहिले तर सर्वसामान्यांच्या अर्थवाहिन्यांना न्याय देण्याचे काम निश्चितपणे होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अपक्ष उमेदवार प्रवीण माने म्हणाले की, या भागातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी चार पाच लाख लीटर क्षमतेचे ‘सोनाई दुध’चे स्वतंत्र युनिट येथे उभारले जाईल.
या वेळी हर्षवर्धन पाटील यांचा नामोल्लेख न करता, संस्था, ऊस, कर्मचा-यांच्या माध्यमातून दाबादाबी केली तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा देत, तसे होवू नये यासाठी सहकारी संस्था खाजगी पध्दतीने न चालवता सहकारी तत्वावर चालवाव्यात असा सल्ला मयुर पाटील यांनी दिला.