-राहुलकुमार अवचट
यवत : दौंडमध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर राहणार नाही, शरद पवार घेतील तो निर्णय मान्य असेल, असे दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी चौफुला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
सध्या दौंड तालुक्यात शरद पवार गटाचा तुतारी चिन्हावर कोण उमेदवार असणार याची उत्सुकता तालुक्यातील जनतेला लागलेली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर नाव असलेले माजी आमदार रमेश थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवार घेतील तो निर्णय मान्य असेल, असे सांगत शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच केले.
गेल्या वर्षभरामध्ये या राज्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये आम्ही कार्यकर्ते भाजपाबरोबर गेलो, भाजपचा गेल्या वर्षापासूनचा अनुभव अत्यंत वाईट म्हणून अशा ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे की शरदचंद्र पवार हे खरंच देशाचे व महाराष्ट्राचे दैवत आहे, आमची फार मोठी चूक झालेली असून ही बाब लक्षात आल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर राहण्याचा माझ्यासह कार्यकर्त्यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे. आमची फार मोठी चूक झालेली आहे आणि आम्हाला त्याबद्दल शरद पवार यांनी माफी करावी, अशा प्रकारची विनंती करतोय. पुढच्या काळात भक्कमपणाने कायमस्वरूपी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच 28 तारखेपर्यंत उमेदवारी बाबत निर्णय होईल.
उमेदवारी बाबत शरद पवार यांच्याकडून अजून कसलाही निर्णय दिलेला नाही. परंतु उद्या सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर) पर्यंत निर्णय होईल. दौंड तालुक्यातील राजकीय घडामोडीमुळे उमेदवारी देण्यास विलंब होत असल्याचे यावेळी रमेश थोरात यांनी सांगितले. रमेश थोरात यांनी तुतारी चिन्ह मिळावे, यासाठी पक्षश्रेष्ठीसोबत चार बैठका केल्या आहेत, असे असून देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अजून तरी प्रवेश केलेला नाही. तुतारी चिन्हावर आप्पासाहेब पवार हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने रमेश थोरात यांनी सावध भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केला नाही, असे आज झालेल्या पत्रकार परिषदेत जाणवत आहे.
तालुक्यातील अनेक जण शरद पवार गटांकडून इच्छुक आहेत. सर्व्हेमध्ये जे आघाडीवर नाव असेल त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी एबी फॉर्म न मिळाल्यास जनतेचा कौल घेऊन पुढे निर्णय घेतला जाईल, असे देखील रमेश थोरात यांनी सांगितले.