पुणे: पुणे शहर पोलीस दलातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्यामुळे दोन वेगवेगळ्या प्रकरणात हे पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.
कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले होते. दरम्यान, हा आरोपी ससून रुग्णालयातून पोलिसांच्या तावडीत असताना पळून गेला होता. याप्रकरणी पोलीस शिपाई पोपट खाडे आणि पोलीस शिपाई निखिल पासलकर हे दोघेही सायबर पोलीस विभागात कार्यरत होते. या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या तावडीतून मार्शल लीलाकर या आरोपीने पळ काढला होता. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
तर दुसऱ्या प्रकरणात पुण्यातील मगरपट्टा पोलीस चौकीत एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली असता पोलीस दलातील तीन जण दोषी असल्याचे आढळून आले. यामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मगरपट्टा पोलीस चौकीत कार्यरत असणारे एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचे देखील निलंबन करण्यात आले.
काय आहे स्वाती मोहोळ धमकी प्रकरण?
कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. सोशल मीडियावर मुन्ना उर्फ साहिल पोळेकरच्या नावाने अकाऊंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच स्वाती मोहोळ यांना मेसेज करुन आणि आक्षेपार्ह पोस्ट करत ही धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. नेमका हाच आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता.