उरुळी कांचन : दुचाकी भरधाव वेगाने चालवून रस्त्यावरील घाण पाणी पत्नी व बहिणीच्या अंगावर उडविल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पाच जणांना लाकडी दांडके, गज, कुऱ्हाड, दगड, विटांनी फ्री स्टाईल मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना टिळेकरवाडी (उरुळी कांचन, ता. हवेली) येथील राऊत वस्ती परिसरात गुरुवारी (ता.४) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संदिप मच्छींद्र राऊत (वय 50 धंदा शेती रा. टिळेकर वाडी राउत वस्ती उरुळीकांचन ता. हवेली जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अशोक विठोबा राऊत, नितीन अशोक राऊत, सुशिल अशोक राऊत, सौरभ भरत राऊत, तुकाराम गायकवाड, कुंडलिक गायकवाड, प्रणव गायकवाड, पुष्पा अशोक राऊत, कविता नितीन राऊत, रुपाली सुशिल राऊत, कुमार शंकर राऊत, वैशाली गायकवाड (सर्व रा. सापळेकर वाडी, राऊत वस्ती, ता हवेली जि.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या बारा जणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिप राऊत हे शेती करून कुटुंबाचा गाडा चालवितात. तर त्यांची पत्नी सीमाही शेती कामात मदत करतात. फिर्यादी यांना संकेत व सुयश अशी दोन मुले असून ती हडपसर येथे नोकरी करतात. सहजपुर गावची यात्रा असल्याने यात्रेनिमीत्त दोन्ही मुले व बहीण वंदना सतिश झगडे असे घरी आले होते.
दरम्यान, फिर्यादी यांची पत्नी सिमा व बहीण वंदना या गुरुवारी कपडे धुण्यासाठी शेतात गेल्या होत्या. कपडे धुतल्यानंतर घरी येत असताना, फिर्यादी यांचा चुलत चुलता अशोक विठोबा राऊत हे पाठीमागून दुचाकीवरून आले. त्यांनी गाडीची रेस करून रस्त्यावर साचलेले घाण पाणी त्या दोघींच्या अंगावर उडविले.
View this post on Instagram
त्यानंतर फिर्यादी संदिप राऊत यांनी आरोपींकडे विचारणा केली असता, आरोपींनी घरी येऊन शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच आज याला सोडायचा नाही, खल्लास कारायचं, असे म्हणून हातातील लाकडी दांडके, गज, कुऱ्हाड, दगड, विट घेऊन बेकायदा गर्दी जमवून फिर्यादी संदिप राऊत, त्यांची पत्नी सीमा, मुले संकेत, सुयश व बहीण वंदना यांच्या हातपायावर, तोंडावर, पाठीत, डोक्यात, नाकावर, मांडीवर, खांद्यावर मारहाण करुन दुखापत केली.
या मारहाणीत पाच जण जखमी झाले आहेत. तर १२ जणांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार सुजाता भुजबळ करीत आहेत.