इंदापूर, (पुणे) : इंदापूर येथील महाविद्यालयासमोर भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या तरुणावर गोळीबार करून पसार झालेल्या आरोपीला इंदापूर पोलिसांनी वालचंदनगर परिसरातून ताब्यात घेतले आहे.
धीरज ऊर्फ सोन्या चोरमले (रा. शिरसोडी, ता. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर राहुल अशोक चव्हाण (वय – 30, रा. शिरासोडी, ता. इंदापूर) असे गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूल ताब्यात घेतले आहे. इंदापूर शहरातील महाविद्यालयासमोर सायंकाळी सातच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाच्या समोरून हा पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण चालवणारा युवक राहुल चव्हाण महाविद्यालयातून बाहेर पडला होता. दुचाकीवर बसताना दुसर्या दुचाकीवरून आलेल्या एकाने आपल्या जवळील रिव्हॉल्व्हरमधून चार गोळ्या चव्हाणवर झाडल्या आणि तो दुचाकीवरून तोंड बांधून वेगात गाडी चालवत सोलापूरच्या दिशेने पसार झाला होता.
घटना घडताच इंदापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी जखमी चव्हाण यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गोळीबाराचा हा प्रकार हा पूर्व वैमनस्यातून झाला असल्याची प्राथमिक माहितीघेतली व यातील आरोपीला पकडण्यासाठी दोन पथके तैनात करून आरोपीचा शोध सुरू केला.
या घटनेनंतर बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली, त्यांनी हल्ल्यातील जखमी युवकाची चौकशी केली तपास गतीने करण्याच्या सूचना इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना दिल्या. इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपीला इंदापूर पोलिसांनी दोन तासांत वालचंदनगर येथून ताब्यात घेतले.
या घटनेनंतर जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती. याचवेळी वालचंदनगर येथून या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपी धीरज ऊर्फ सोन्या चोरमले शिरसोडी गावातीलच रहिवासी असून, जुन्या भांडणाच्या कारणातून हा गोळीबार केला असल्याची माहिती बारामतीचे अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.
दरम्यान, ग्रामीण भागातही भरदिवसा गोळीबार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बारातमधील घटनेने इतर विद्यार्थ्यांच्याही मानसिकतेवर नकारात्मर परिणाम होऊ शकतो.